२०१८ मध्ये मॅडॉक फिल्म्सने श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडी चित्रपट तयार केला होता. या शैलीत (आशयात) दमदार कामगिरी करत, मॅडॉक फिल्म्सने ‘भेडिया’, ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री २’ सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे मॅडॉक फिल्म्सने एक वेगळे हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स तयार केले. २०२५ पासून मॅडॉक फिल्म्स युनिव्हर्सचे नवे सिनेमे येणार असून , त्यात ‘थामा’, ‘शक्तिशालिनी’, आणि ‘चामुंडा’ यांसारख्या चित्रपटांची भर पडणार आहे.
मॅडॉक फिल्म्स युनिव्हर्स २०२५ ते २०२८ दरम्यान या युनिव्हर्समधून दरवर्षी दोन चित्रपट सादर करणार आहेत. “या युनिव्हर्सचा दुसरा टप्पा २०२५ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘थामा’ पासून सुरू होईल. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२५ रोजी ‘शक्तिशालिनी’ प्रदर्शित होईल. यानंतर १४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘भेडिया २’ आणि ४ डिसेंबर २०२६ ‘चामुंडा’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा…जगभरात गाजलेला ‘केनेडी’ सिनेमा का प्रदर्शित झाला नाही? अनुराग कश्यप नाराजी व्यक्त करत म्हणाला….
१३ ऑगस्ट २०२७ रोजी बहुचर्चित ‘स्त्री ३’ आणि २४ डिसेंबर २०२७ रोजी ‘महामुंज्या’ प्रदर्शित होईल. यानंतर या युनिव्हर्सची भव्य कथा ‘महायुद्ध’ या दोन भागांच्या महाकाव्याद्वारे सादर होऊन या युनिव्हर्सच्या चित्रपटांचा शेवट होईल. मॅडॉक हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील ‘पेहला महायुद्ध’ ११ ऑगस्ट २०२८ रोजी प्रदर्शित होईल, तर ‘दुसरा महायुद्ध’ दिवाळीत १८ ऑक्टोबर २०२८ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे,” असे मॅडॉक फिल्म्स त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या चित्रपटाशी संबंधित असणार्या कलाकारांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे. श्रद्धा कपूरने तिचा फोटो आणि चित्रपटाच्या घोषणेचा फोटो पोस्ट करत “ब्रम्हांड असावे तर असे” अशी कॅप्शन दिली आहे.
या भव्य घोषणेवर प्रतिक्रिया देताना, मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजान म्हणाले, “मॅडॉकचा हेतू नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आहे. आम्ही प्रेक्षकांच्या भावनांना भिडणारी पात्रे निर्माण केली आहेत, जी भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशात रुजलेली आहेत. हा दृष्टीकोन आमच्या कथा केवळ भावनिकच नव्हे, तर अर्थपूर्ण देखील बनवतो. आम्हाला असं सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करायचं, ज्यामुळे अविस्मरणीय पात्रं आणि त्यांचे किस्से नव्या उंचीवर पोहोचतील. ” असे दिनेश विजान यांनी नमूद केले.