Priyanka Chopra : ‘मिस इंडिया’चा मुकूट जिंकून अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘मिस वर्ल्ड’च्या मुकुटालाही गवसणी घातली आणि घराघरात पोहचली. आज प्रियांका हॉलीवूडमध्ये तिच्या करिअरला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहे. तिने आजवर मिळवलेल्या यशामध्ये तिची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांच्यासह आई मधु चोप्रा यांचं मोलाचं योगदान आहे.
मधु चोप्रा नेहमी त्यांच्या मुलीचं आणि तिच्या कामाचं कौतुक करतात. तसेच प्रियांकाने इथपर्यंत पोहचण्यासाठी किती संघर्ष केला त्याबद्दल सांगत असतात. नुकत्याच मधु चोप्रा ‘समथिंग बिगर टॉक’ या शोमध्ये आल्या होत्या. येथे त्यांनी मुलाखतीमध्ये त्यांच्या मुलीला पितृसत्ताक कुटुंबामुळे किती अडचणी आल्या, तसेच तिच्या भविष्याला उजळवण्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टींचा त्याग केला याची माहिती सांगितली आहे.
हेही वाचा : ५० हजार रुपये देऊन खलनायकाची भूमिका करण्यापासून रोखलं; शक्ती कपूर यांनी असं का केलं? बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केला खुलासा
‘मिस इंडिया’मध्ये भाग घेण्यासाठी प्रियांकाच्या वडिलांचा होता विरोध
मधु यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं, “मिस इंडियाच्या स्पर्धेत भाग घेताना प्रियांकाचे स्वर्गीय वडील अशोक चोप्रा यांची परवानगी घेणे फार कठीण होते. प्रियांका त्यावेळी इयत्ता बारावीमध्ये शिकत होती, तिची बोर्डाची परीक्षा होती, त्यामुळे तिच्या वडिलांचा होकार मिळवणे फार कठीण होते. माझ्या दोन्ही मुलांनी त्यांना प्रियांकाला ‘मिस इंडिया’मध्ये भाग घ्यायचा आहे, त्यासाठी परवानगी देण्यास सांगितले. त्यावेळी ते म्हणाले की, सध्या बोर्डाचे वर्ष आहे आणि हे सोपे नाही. तिला जास्त अभ्यास करू द्या. या सर्व गोष्टींमुळे अभ्यासातून लक्ष विचलित होते. अशोक यांनी असे सांगितल्याने माझी दोन्ही मुले निराश होऊन त्यांच्या बेडरुममध्ये गेली.”
“त्यानंतर मी अशोक यांना विचारले, आपल्या देशात किती जणांना ही संधी मिळते? तिच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे आणि फक्त एका आठवड्याचाच प्रश्न आहे. त्यावर त्यांनी ठीक आहे, असे म्हणत परवानगी दिली”, असे मधु चोप्रा यांनी सांगितले.
काकांनीही केला विरोध
मधु यांनी पुढे सांगितले की, “प्रियांकाला स्पर्धेत उतरण्याआधीच मोठा संघर्ष करावा लागला होता. माझ्या पतीचे मोठे भाऊ त्यावेळी कुटुंबातील प्रमुख होते. त्यामुळे त्यांची परवानगी मिळवणे हे आणखी एक मोठे आव्हान आमच्यासमोर उभे होते. आम्ही सर्व जण त्यांच्या घरी गेलो, त्यांना सर्व काही सांगितले. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही स्वत: तुमच्या मुलांच्या डोक्यात हे विचार भरवत आहात. आपल्या घरातील मुली अशा कोणत्याही गोष्टी करत नाहीत. हे ऐकून प्रियांकाला फार वाईट वाटले, ती तेथे खूप रडली. मात्र, तरीही तिच्या काकांनी तिला परवानगी दिली नाही. त्यावर मी त्यांच्या पत्नीला सर्व काही समजावले. पुढे प्रियांकाच्या काकांनीसुद्धा परवानगी दिली. मात्र, यासाठी त्यांनी मला एक अट घातली. त्यांनी सांगितले की, प्रियांकाला आम्ही परवानगी देऊ, पण तू नेहमी तिच्याबरोबर असली पाहिजे. त्यासाठी तुला तुझी मेडिकल प्रॅक्टिस सोडावी लागेल. त्यावर मी लगेच हो म्हणाले. माझे पती अशोक यांनीसुद्धा यासाठी होकार दिला होता”, असे मधु यांनी सांगितले.
Video: “ही माझी साथी, सवंगडी…”, सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीबद्दल केला खुलासा
दरम्यान, संघर्षावर मात करत आज प्रियांकाने संपूर्ण जगभर नाव कमावले आहे. बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता ती हॉलीवूड सिनेविश्व गाजवताना दिसतेय.