Madhubala and Kishor Kumar Relation: मधुबाला अशा कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांच्या चित्रपटांची आजही मोठी चर्चा होताना दिसते. मधुबाला यांचा अभिनय पाहणे म्हणजे बॉलीवूडमधील सोनेरी काळ होता, असे म्हटले जाते.

मधुबाला यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील कुतूहलाचा विषय होता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतके दु:ख होते की, त्यांना ट्रॅजेडी क्वीन म्हणूनही ओळखले जाते.आता मधुबाला यांची बहीण मधुर भूषण यांनी एका मुलाखतीत मधुबाला यांच्या आयुष्याबाबत वक्तव्य केले. तसेच, मधुबाला यांचे किशोर कुमार व दिलीप कुमार यांच्याबरोबर असलेल्या नात्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले. जाणून घेऊ मधुबाला यांच्या बहिणीने नेमके काय म्हटले आहे.

मधुबाला तरुण वयात दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही. अहंकारामुळे त्यांचे नाते तुटले, असे म्हटले जाते. दिलीप कुमार यांच्याबरोबरचे नाते संपुष्टात आल्यानंतर मधुबाला किशोर कुमार यांच्या प्रेमात पडल्या. त्याआधी किशोर कुमार व मधुबाला यांनी अनेक चित्रपटांत काम केले होते. ‘ढाके की मलमल’, ‘चलती का नाम गाडी’ व ‘हाफ तिकीट’ या चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले होते.

“ती दोन वर्षांहून अधिक काळ जगू शकणार नाही.”

मधुबाला यांच्या हृदयाला छिद्र पडल्यानंतरही त्यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या. त्याबद्दल मधुर यांनी आठवण सांगितली. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत, मधुर भूषण म्हणाल्या, “ती आजारी होती. त्यामुळे वडील म्हणाले की, आता लग्न करू नको. डॉक्टर काय म्हणतात ते बघा. पण १९६० ला त्यांनी लग्न केले. लग्नानंतर किशोर कुमार यांनी मधुबालाला उपचारांसाठी लंडनला नेले. तिथे डॉक्टरांनी असे सांगितले की, तिचे हृदय निकामी झाले आहे. ती दोन वर्षांहून अधिक काळ जगू शकणार नाही.”

पुढे मधुर म्हणाल्या, “किशोर कुमार यांनी मधुबालाला आमच्या घरी आणून सोडले. ते म्हणाले की, ती आजारी असल्याने तिची काळजी घेणारे कोणीतरी हवे आहे. मला काम करावे लागते. त्यानिमित्ताने मी प्रवास करीत असतो. गाणी गात असतो, मी माझ्या कामात व्यग्र असतो. मी तिला वेळ देऊ शकणार नाही. मी खूप प्रयत्न केले. तिला लंडनला घेऊन गेलो. पण, डॉक्टरांनी ती जगणार नाही, असे सांगितले आहे. त्यात माझी काय चूक आहे?”

मधुर म्हणाल्या, “किशोर कुमार चुकीचे होते, असे आम्ही म्हणत नाही. मात्र, त्यांनी तिला भावनिक आधार दिला नाही. डॉक्टरांनी मधुबालाला सांगितले होते की, ती आई होऊ शकत नाही. पण, काहीही झाले तरी एका स्त्रीला पाठिंब्याची गरज असते. या सगळ्यात मधुबालाने किशोर यांच्याबरोबर राहण्याचा आग्रह धरला. त्यामुळे किशोर कुमार यांनी तिला क्वार्टर रोडला एक फ्लॅट घेऊन दिला. तिथे ती बऱ्याचदा एकटी असायची. त्यामुळे ती जास्त आजारी पडली. किशोर कुमार यांनी तिला भेटणे कमी केले. त्यामुळे तिला ईर्षा वाटायची. किशोर कुमार यांचा फोन लागत नसे. दोन-तीन महिन्यांतून ते एकदा तिला भेटत असत. ते मधुबालाला म्हणत, “मी जर आलो, तर तू रडशील आणि ते तुझ्या हृदयासाठी चांगले नाही. तू नैराश्यात जाशील. ती तरुण होती. तिला ईर्षा वाटणे स्वाभाविक होते. कदाचित सोडून दिल्याच्या भावनेने तिला मारले”, असे वक्तव्य किशोर कुमार यांनी केले.

मधुर यांनी असेही म्हटले की मधुबालाकडे प्रचंड इच्छाशक्ती होती. हदयविकाराचा झटका आणि प्राणघातक आजाराला तोंड देऊनही तिला जगायचे होते. डॉक्टरांनी ती दोन वर्षेच जगेल असे म्हटले होते; मात्र ती पुढे नऊ वर्षे जगली. १९६९ ला तिचे ३६ व्या वर्षी निधन झाले.