बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकार(Madhur Bhandarkar) हे त्यांच्या महिला प्रधान चित्रपटांसाठी ओळखले जातात. २००१ साली प्रदर्शित झालेला ‘चांदनी बार’, २००५ साली प्रदर्शित झालेला ‘पेज ३’, २००६ साली प्रदर्शित झालेला ‘कार्पोरेट’, २००८ आणि २०१२ साली अनुक्रमे ‘फॅशन’ आणि ‘हिरोईन’ या चित्रपटांनी धुमाकूळ घातला होता. या चित्रपटांनी फक्त बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला नाही, तर समीक्षकांकडून देखील शाबासकी मिळवली. हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते.
मधुर भांडारकर यांचा पहिला चित्रपट ‘चांदनी बार’मध्ये तब्बू प्रमुख भूमिकेत होती. तब्बूने या चित्रपटात सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला मोठे यश मिळाले. मात्र, जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा मधुर भांडारकर चित्रपटगृहांना भेटी देण्याऐवजी, लोकांना चित्रपट आवडला की नाही हे पाहण्याऐवजी घरी आराम करीत होते. त्यावेळी महेश भट्ट यांनी त्यांना फोन करत शिवीगाळ केली होती, अशी आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली.
महेश भट्ट साहेबांचा फोन….
मधुर भांडारकर यांनी नुकतीच ‘गेम चेंजर्स’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. करिअरमधील पहिला चित्रपट चांदणी बार प्रदर्शित झाल्यानंतर काय घडले होते, याची त्यांनी आठवण सांगितली. मधुर भांडारकर म्हणाले, “मला आठवतं मी माझ्या १ बीचके घरात कार्पेटवर झोपलो होतो. फॅन सुरू होता. त्या काळात माझ्याकडे एसी नव्हता. दुपारी २ वाजल्याच्या सुमारास महेश भट्ट साहेबांचा फोन आला. त्याआधी मी त्यांना २-३ वेळेस भेटलो होतो. त्यांनी मला विचारले की तू कुठे आहेस? मी झोपेत होतो. त्यांना म्हणालो की घरी आहे. त्यांनी मला शिवीगाळ केली. ते मला म्हणाले की तू वेडा आणि मूर्ख आहेस. तुझा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे आणि तू झोपा काढत आहेस? जा आणि थिएटर्सच्या बाहेर असलेली गर्दी बघ. असे क्षण पुन्हा पुन्हा बघायला मिळणार नाहीत. त्यांच्या शब्दांनी मला ऊर्जा मिळाली. मी त्यांची माफी मागितली आणि अग्निशमन दलाने अलार्म वाजवल्यासारखे पळत गेलो.”
मधुर भांडारकर म्हणाले की मी मुंबईतील गेटी गॅलक्सी आणि स्टार सिटी थिएटरमध्ये गेलो. मला कोणीही ओळखत नव्हते. पण, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मी महेश भट्ट साहेबांना फोन केला आणि मला परिस्थितीची जाणीव करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मला असे कोणीतरी सांगण्याची गरज होती. महेश सर बरोबर म्हणाले होते. लोक अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांची वाट बघत असतात. तुम्हाला दररोज असे चित्रपट पाहायला मिळत नाहीत.
याबद्दल अधिक बोलताना मधुर भांडारकर म्हणाले, “शुक्रवारनंतर मी कांदिवलीतील एका थिएटरच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. त्यावेळी मला कोणीही ओळखत नव्हते. मी पाहिले की लोक स्क्रीनला चिटकून उभे आहेत. पण, प्रेक्षकांना चित्रपट आवडला आहे की नाही, याबद्दल कळत नव्हते. ते खूप गंभीर दिसत होते. चित्रपट संपल्यानंतर लोक थिएटरबाहेर येऊ लागले, तेव्हा मी त्यांना विचारले की सिनेमा कसा आहे? काहींनी चित्रपट चांगला असल्याचे सांगितले. तर काही लोक त्यावर काहीच बोलले नाहीत. त्यामुळे मला पुन्हा चिंता वाटू लागली. मात्र, त्यानंतर देशभरातून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. तब्बूने मला पहिला फोन केला होता. ती म्हणाली होती की सर, तुम्ही तर कमाल केली. अनेक वितरकांनीही मला फोन केला. जेव्हा माध्यमांनी बोलवून माझे अभिनंदन केले, त्यावेळी मला आत्मविश्वास वाटू लागला. पहिल्याच चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता”, अशी आठवण मधुर भांडारकर यांनी सांगितली.