गेल्या वर्षापासूनच सिनेरसिक बॉलीवूडवर चांगलेच नाराज असल्याचं दिसत आहे. मोठमोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपट फ्लॉप ठरत असून ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’साठी प्रेक्षक बॉक्स ऑफिसवर गर्दी करत आहेत. ‘पठाण’सारखा एखादा अपवाद वगळता बऱ्याच बॉलीवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ‘बॉयकॉट बॉलीवूड’ हा ट्रेण्ड बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर व्हायरल आहे.
२०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर हा बॉयकॉट ट्रेण्ड जोर धरू लागला, असं दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी स्पष्ट केलं आहे. मनीष पॉलबरोबरच्या पॉडकास्टमध्ये मधुर भांडरकर यांनी बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये त्यांनी बॉयकॉट कल्चरवरही त्यांचं मत मांडलं. सुशांतच्या रहस्यमय मृत्यूमुळे लोकांचा राग अनावर झाल्याचं मधुर यांनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा : सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ‘विक्रम वेधा’ ओटीटीवर होणार प्रदर्शित; वाचा कुठे अन् कधी पाहता येणार
मधुर भांडारकर म्हणाले, “सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर हा बॉयकॉट ट्रेण्ड जोर धरू लागला. कदाचित या चित्रपटसृष्टीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल. तो एका सामान्य कुटुंबातून आला होता आणि त्याने प्रचंड मेहनतही घेतली होती. त्याचा मृत्यू हा फारच दुर्दैवी आणि धक्कादायक होता. यानंतरच प्रेक्षकांचा राग अनावर व्हायला लागला. अर्थात हे त्यांचं मत आहे.”
बॉयकॉट ट्रेण्डमुळे लोक चित्रपट बघायला येत नाहीत, ही गोष्ट मात्र मधुर यांनी या मुलाखतीमध्ये खोडून काढली. ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘कांतारा’, ‘द कश्मीर फाइल्स’ या अशा चित्रपटांची उदाहरणं देत मधुर यांनी हे स्पष्ट केलं की चांगला कंटेंट असेल तर प्रेक्षक चित्रपट बघायला येतात. मधुर भांडारकर यांचा ‘इंडिया लॉकडाउन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. याबरोबरच त्यांनी नुकतंच ‘सर्किट’ या चित्रपटातून मराठीमध्ये निर्माता म्हणून पदार्पण केलं.