बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची जबाबादारी निभावत आहे. तिच्या जोडीने अभिनेता सुनील शेट्टी सुद्धा या कार्यक्रमाचं परीक्षण करत आहे. ‘डान्स दीवाने’ शोमध्ये प्रत्येक आठवड्याला स्पर्धकांना डान्स सादरीकरण करण्यासाठी एक नवीन थीम देण्यात येते. परंतु, यंदाच्या आठवड्यात माधुरीच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धक व काही कलाकार तिच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स सादरीकरण करणार आहेत.
माधुरी १५ मे रोजी तिचा ५७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने ‘डान्स दीवाने’मध्ये तिच्यासाठी खास सरप्राइज प्लॅन करण्यात आलं होतं. भर कार्यक्रमात अभिनेत्रीचे पती डॉ. श्रीराम नेनेंची एन्ट्री झाल्याने माधुरी भारावून गेली होती. यावेळी तिच्या घरच्या श्वानाला देखील मंचावर आणण्यात आलं होतं. डॉ. श्रीराम नेने येताच माधुरी त्यांना मिठी मारते व त्यांना असं अचानक सेटवर आलेलं पाहून प्रचंड आनंद झाल्याचं सांगते. यावेळी भारती “मेरा पिया घर आया ओ रामजी…” हे गाणं गात असल्याचं पाहायला मिळालं.
माधुरी दीक्षितचा पतीसह रोमँटिक डान्स
यानंतर माधुरी तिच्या पतीबरोबर “तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिल के…” या रोमँटिक गाण्यावर जबरदस्त डान्स करणार असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. माधुरी आणि डॉ. नेने कपल डान्स करत असताना त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करण्यात येत आहे. कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा खास प्रोमो शेअर केला आहे.
माधुरी आणि डॉ. नेनेंनी केलेल्या या रोमँटिक कपल डान्सवर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हा डान्स करताना अभिनेत्रीने गोल्डन-सिलव्हर रंगाचा सुंदर असा गाऊन परिधान केल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे भारती या दोघांचीही नजर काढत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : Video: सिद्धार्थ जाधव व सुरेश रैनाची झाली ग्रेटभेट, क्रिकेटरने अभिनेत्याचं केलं कौतुक; व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. अभिनयाबरोबर प्रेक्षक तिच्या डान्सचे सुद्धा दीवाने आहेत. सध्या माधुरी आणि तिच्या नवऱ्याने केलेल्या रोमँटिक डान्सवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चालू आहे.