‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘खलनायक’, ‘दिल तो पागल हैं’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये माधुरी दीक्षितने भूमिका साकारल्या आहेत. तिला ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आजच्या घडीला सुद्धा माधुरीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बॉलीवूडमध्ये अभिनेत्रीला धकधक गर्ल म्हणून देखील ओळखलं जातं. सध्या माधुरी तिच्या ‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.
‘डान्स दीवाने’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या २५ मे रोजी कलर्स वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. या महाअंतिम सोहळ्यात बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यन सहभागी होणार आहे. नुकताच त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने कार्तिकने ‘डान्स दीवाने’च्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’चं अव्वल स्थान कायम! टॉप २० मध्ये ‘झी मराठी’च्या ‘या’ मालिकांना स्थान, पाहा TRPची संपूर्ण यादी
महाअंतिम सोहळ्यात माधुरी आणि कार्तिक यांनी एकत्र डान्स केल्याचा प्रोमो कलर्स वाहिनीच्या इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते बॉलीवूड कलाकारांमध्ये प्रत्येकजण धकधक गर्लचा चाहता आहे. त्यामुळे माधुरीबरोबर डान्स करण्याची संधी मिळाल्याने कार्तिक सुद्धा भलताच आनंदी झाला होता.
माधुरी आणि कार्तिक यांनी मिळून ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटातील “ढोलना…” गाण्यावर जबरदस्त डान्स केला. ‘दिल तो पागल हैं’ हा चित्रपट १९९७ मध्ये म्हणजेच जवळपास २७ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा “ढोलना…” गाण्यावर डान्स करून धकधक गर्लने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
माधुरी आणि कार्तिकच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “माधुरी खरंच खूप जास्त सुंदर दिसते”, “या एपिसोडची आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहतोय”, “माधुरी दीक्षित भुल भुलैय्या चित्रपटात पाहिजे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, माधुरी दीक्षित आणि अभिनेता कार्तिक आर्यन ‘भुल भुलैय्या ३’मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्याचं वृत्त ‘मिड डे’ने दिलं आहे.