Sanjay Dutt And Madhuri Dixit Breakup : ‘रॉकी मेरा नाम’ म्हणत १९८१ मध्ये संजय दत्तने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. त्याच्या ‘रॉकी’ या पहिल्याच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं होतं. मात्र, संजयच्या फिल्मी करिअरप्रमाणे त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिलं. अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार अनुभवले. यादरम्यान अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव देखील जोडलं गेलं. संजयचं पहिलं लग्न अभिनेत्री रिचा शर्माबरोबर झालं होतं. याचदरम्यान ‘साजन’ सिनेमानंतर सर्वत्र माधुरी-संजय यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.

‘खलनायक’च्या शूटिंदरम्यान माधुरी व संजय यांच्यातील जवळीक आणखी वाढली. मात्र, हे नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. ‘हिंदी रश’च्या पॉडकास्टमध्ये ज्येष्ठ सिनेपत्रकार पूजा सामंत यांनी याविषयी खुलासा केला आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवण्यात आल्यावर माधुरीच्या वडिलांनी तिला त्याच्यापासून दूर केल्याचं पूजा सामंत या पॉडकास्टमध्ये म्हणाल्या.

पूजा यांनी सांगितलं की, “माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा त्याकाळी सर्वत्र होत्या. त्या दोघांचे एकत्र सिनेमे आले, या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर यश देखील मिळालं. पुढे, १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात संजयचं नाव आलं होतं, त्यानंतर एक गोष्ट माझ्या कानावर आली होती. तेव्हाचे प्रसिद्ध फोटोग्राफर होते त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. माधुरीला तिच्या वडिलांनीच संजय दत्तपासून वेगळं केलं.”

पूजा पुढे म्हणाल्या, “माधुरीच्या वडिलांनी तिला समजावलं होतं की, हा मार्ग तुझ्यासाठी नाहीये. आज हा अभिनेता अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकलाय. तर भविष्यात कोण गॅरंटी घेईल की तो खूप चांगला नवरा होईल. त्यामुळे तू या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. त्यांचा तो निर्णय योग्य ठरला.”

“यानंतर माधुरीला तिचे कुटुंबीय अमेरिकेत घेऊन गेले. त्यानंतर काही वर्षांनी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीचं लग्न झालं. त्यांचा संसार सुखाचा झाला आणि यामागे अभिनेत्रीच्या कुटुंबीयांचं खूप मोठं योगदान आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याने आयुष्य कसं बदलतं हे तिच्या घरच्यांनी सिद्ध करून दाखवलं. आता माधुरी आणि संजय दत्त यांचं नेमकं काय होतं हे मलाही माहीत नाही. त्यांचे चित्रपट चालले, हो जवळीक होती या चर्चा नक्कीच होत्या. पण, तिने संजय दत्तबरोबर जास्त काम करू नये, हे नातं पुढे जाऊ नये यासाठी अभिनेत्रीच्या वडिलांनी लक्ष ठेवलं होतं. तिला वेगळं होण्यास सांगितलं होतं.” असा दावा या पॉडकास्टमध्ये पूजा यांनी केला आहे.