बॉलीवूडमधील ९० च्या दशकातील असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांचे आजही लाखो चाहते असल्याचे पाहायला मिळते. काही चित्रपट, काही गाणी, काही कलाकरांच्या जोड्या या प्रेक्षकांच्या जवळच्या असल्याचे पाहायला मिळते. आजही ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामधील एक म्हणजे ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट आहे. या सिनेमातील ‘कोई लडकी है’ हे गाणेदेखील मोठ्या प्रमाणात गाजल्याचे पाहाय़ला मिळाले होते. शाहरूख खान(Shah Rukh Khan) व माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)च्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी कोई लडकी है या गाण्यावर एकत्र थिरताना दिसली आहे.
जयपूरमध्ये सध्या आयफा पुरस्कार सोहळा २०२५ सुरू आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नुकताच शाहिद कपूर व करीना कपूर यांनी एकमेकांशी संवाद साधला, गळाभेट घेतली असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरूख खानने काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे, तर माधुरी दीक्षितने काळ्या व पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी कोई लडकी है या गाण्याची हूक स्टेप केली आहे. आता या धमाकेदार डान्सनंतर चाहते त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी म्हटले आहे की, त्यांचे वय वाढत नाहीये; तर काहींनी म्हटले की त्यांचा ९० च्या दशकातील बॉण्ड खूप आवडला, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.
शाहरूख खान आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी शुक्रवारी पोहोचला आहे. जयपूरच्या विमानतळावर चाहत्यांनी त्याला भेटण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीने सोशल मीडियावर किंग खानचा एक फोटो शेअर केला. त्याबरोबरच, लवकरच आयफा पुरस्कार सोहळ्यात भेटू , असे कॅप्शनमध्ये लिहिले. शाहरूख खान व माधुरी दीक्षित यांनी ‘हम तुम्हारे है सनम’, ‘दिल तो पागल है’, ‘कोयला’, ‘देवदास’, ‘अंजाम’, या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यात कार्तिक आर्यन पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे.
OMG Nostalgia! Shah Rukh Khan and Madhuri Dixit to perform on this song from Dil To Pagal Hai at #IIFA2025 .#ShahRukhKhan pic.twitter.com/MQPT9HhoTC
— ℣ (@Vamp_Combatant) March 8, 2025
शाहरूख खानच्या कामाबद्दल बोलायचे तर तो २०२३ मध्ये राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटात दिसला होता. लवकरच तो ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर त्याची लेक सुहाना खानदेखील दिसणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार असून २०२६ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्री नुकतीच ‘भुल भूलैय्या ३’ या चित्रपटात दिसली होती. कार्तिक आर्यन व विद्या बालन यांच्याबरोबर अभिनेत्रीने स्क्रीन शेअर केली होती. याबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.