मुंबई : विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या ‘भूलभुलैया’ चित्रपट श्रृंखलेतील दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यांनी केलेल्या विक्रमी आर्थिक कमाईमुळेच आता सिक्वेलपटांच्या नव्या समीकरणांनुसार ‘भूलभुलैया ३’ या तिसऱ्या चित्रपटाचा घाट घातला गेला. ऐन दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची झलक लोकांसमोर आली असून त्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विद्या बालन या दोघीही मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघींपैकी खरं मंजुलिकाचं भूत कोणतं? हे कोडं प्रेक्षकांना या चित्रपटाच्या छोट्याशा झलकीतून घालण्यात आलं आहे. दोघींचेही चित्रपटातील भयंकर चेहरे पाहवत नसले तरी तिसऱ्या चित्रपटात या दोन कसलेल्या अभिनेत्री आमनेसामने येणार आहेत हेच वैशिष्ट्य.

हेही वाचा >>> नाट्यरंग : ‘त्या तिघी’ हिमालयाच्या सावल्यांची खडतर आयुष्यं

‘भूलभुलैया ३’ या चित्रपटाची पहिली झलक राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या एका सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आली. जयपूरमधील राज मंदिर सिनेमा या ठिकाणी हा खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, दिग्दर्शक अनीस बाझ्मी आणि कलाकार कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन, राजपाल यादव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. अनीस बाझ्मी दिग्दर्शित ‘भुलभुलैया ३’ हा चित्रपट दिवाळीत १ नोव्हेंबर रोजी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाबरोबर प्रदर्शित होणार आहे.

‘भूलभुलैया’ या २००७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. या चित्रपटाचा सिक्वेल करणे योग्य नाही असे सांगत चित्रपटातील मुख्य कलाकार अभिनेता अक्षय कुमार याने दुसऱ्या चित्रपटासाठी नकार दिला होता. त्यानंतर पंधरा वर्षांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची जबाबदारी दिग्दर्शक अनीस बाझ्मी यांच्यावर सोपवण्यात आली. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बूची दुहेरी भूमिका असलेला ‘भूलभुलैया’ही यशस्वी ठरला.

हेही वाचा >>> आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुचित्रपट महोत्सव गोव्यात

आता तिसऱ्या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन मंजुलिका म्हणून परतणार असल्याचे संकेत आधीच देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र चित्रपटाच्या पहिल्या झलकीत विद्या बालनबरोबर अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही मंजुलिकाच्या भूमिकेत आणत दिग्दर्शकाने प्रेक्षकांना धक्का दिला आहे. आता यातल्या खऱ्या मंजुलिकेचा शोध घेण्यातच चित्रपटाची कथा संपते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्यासह या चित्रपटात राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा या कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर अजय देवगण, दीपिका पादुकोण, करिना कपूर, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सिंघम अगेन’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या दोघांमध्ये सर्वात भयंकर अनुभव कोण देणार? अशी चर्चा सध्या चित्रपटप्रेमींमध्ये रंगली आहे.