राजस्थानचे विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांनी लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बुधवारी राजस्थान विधानसभेत बोलताना काँग्रेस आमदार टीकाराम जूली यांनी इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (आयफा) पुरस्कारांवर होणाऱ्या खर्चाबाबत राज्य सरकारला सवाल केला. या पुरस्कार सोहळ्याला तुलनेने कमी बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते आणि या सोहळ्याचा राज्यावर काय परिणाम झाला असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

“आयफा सोहळ्याचा आपल्याला काय फायदा झाला? किती मोठे स्टार्स उपस्थित राहिले? त्यांनी कोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली? ते कोणत्याही पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी गेले नाहीत आणि या सोहळ्याला कोणते मोठे कलाकार हजर होते? शाहरुख खान वगळता, सर्व सेकंड ग्रेड कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. शाहरुख खान सोडल्यास टॉप ग्रेडचा एकही अभिनेता तिथे उपस्थित नव्हता.” असं टीकाराम जूली म्हणाले.

टीकाराम बोलत असताना विधानसभेच्या एका सदस्याने माधुरी दीक्षितचं नाव घेतलं. यामुळेच वाद निर्माण झाला आहे. “माधुरी दीक्षित आता सेकंड ग्रेड अभिनेत्री आहे. तिचा काळ आता निघून गेला आहे. ती ‘दिल’ आणि ‘बेटा’ यांसारखे चित्रपट आले तेव्हा मोठी स्टार होती. त्यामुळे आता या सोहळ्याला कोणतेही मोठे स्टार्स उपस्थित राहिले नव्हते. अमिताभ बच्चन सुद्धा आले नव्हते. तर मग या सोहळ्याला कोण आलं होतं?”

याशिवाय, काँग्रेस आमदार जूली, गायक सोनू निगमच्या अनुपस्थितीबद्दल म्हणाले, “सोनू निगमला आमंत्रित करायला हवं होतं. त्याला इन्व्हेस्टर समिटला आमंत्रित केलं होतं, पण आयफाला नाही.”

टीकाराम जूली यांनी माधुरीबद्दल केलेल्या वक्तव्याला ‘निंदनीय’ म्हणत राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी म्हणाल्या, “प्रत्येक कलाकाराचा आणि त्यांच्या कलेचा आदर केला पाहिजे; एका महिला कलाकाराबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. ते सभागृहात जे बोलले ते निंदनीय आहे.”

दरम्यान, जयपूरमध्ये पार पडलेल्या ‘आयफा २०२५’ पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती. करण जोहर, करीना कपूर खान, शाहिद कपूर, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा अशा अनेक स्टार्सनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.