Madhuri Dixit : ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. धकधक गर्लचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून माधुरीने सिनेविश्वातील प्रवासाला सुरुवात केली. ‘तेजाब’नंतर माधुरीला खरी ओळख मिळाली अन् त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘हम आपके हैं कौन’, ‘दिल तो पागल हैं’, ‘देवदास’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अभिनेत्रीच्या चित्रपटांमधील सगळी गाणी सुपरहिट ठरली.
माधुरीच्या ( Madhuri Dixit ) सिनेविश्वातील प्रवासाला नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेत्री खास अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. धकधक गर्लच्या चाहत्यांसाठी विविध शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये माधुरीच्या चाहत्यांना तिला लाइव्ह पाहण्याची संधी मिळते. याशिवाय ‘हूकस्टेप विथ माधुरी’ या सेगमेंटमध्ये अभिनेत्री तिच्या सुपरहिट गाण्यांच्या हूकस्टेप करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.
हेही वाचा : Video : “वाटाण्याचा गोल दाना…”, ‘रंग माझा वेगळा’मधील अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स! दीपा, श्वेता अन् लावण्याचं Reunion
माधुरी दीक्षित प्रसिद्ध अभिनेत्यासह थिरकली
‘देवदास’ चित्रपटातील सगळीच गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यामधलं ‘डोला रे डोला’ हे एव्हरग्रीन गाणं आजही प्रत्येक समारंभात वाजवलं जातं. अमेरिकेच्या दौऱ्यावर माधुरीने सुद्धा या गाण्यावर ठेका धरला होता. यावेळी अभिनेत्रीला प्रसिद्ध अभिनेता शालीन भानोतने साथ दिली. याचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माधुरी ( Madhuri Dixit ) यातील एका व्हिडीओमध्ये शालीनला डान्स करताना लेहेंगा घालायला सांगते आणि त्यानंतर दोघे एकत्र ‘डोला रे डोला’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शालीनला लेहेंगा घालून डान्स करताना पाहून उपस्थित प्रेक्षकांनी देखील एकच जल्लोष केला. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हे व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ व ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.
दरम्यान, माधुरी दीक्षितचा ( Madhuri Dixit ) या वयातील फिटनेस, तिच्या दिलखेचक अदा आणि जबरदस्त डान्स पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करतात. याशिवाय धकधक गर्लच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता लवकरच ती कार्तिक आर्यनबरोबर ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
© IE Online Media Services (P) Ltd