Madhuri Dixit Dance Video : ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुन अभिनेत्री माधुरी दीक्षित घराघरांत लोकप्रिय झाली. तिला बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून देखील ओळखलं जातं. ‘दिल तो पागल हैं’, ‘हम आपके हैं कौन’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘खलनायक’, ‘साजन’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये माधुरीने मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. तिने केवळ अभिनयानेच नव्हे तर आपल्या नृत्यशैलीने सुद्धा चाहत्यांना भुरळ घातली आहे.
माधुरी दीक्षितने तिच्या अनेक चित्रपटांमध्ये डान्स फेस ऑफचे सीक्वेन्स केले आहेत. आज वयाच्या ५७ व्या वर्षी सुद्धा अभिनेत्री तेवढीच फिट आहे. माधुरी व विद्या बालनचा भव्य डान्स फेस ऑफ नुकताच ‘भुल भुलैया ३’ मध्ये पाहायला मिळाला होता. आता अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पार्टीमधला आहे.
आयकॉनिक गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स
माधुरी दीक्षितने तिच्या २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ चित्रपटातील आयकॉनिक ‘डोला रे डोला’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. हा एका व्रॅपअप पार्टीमधला व्हिडीओ आहे. माधुरी दीक्षितची महत्त्वाची भूमिका असणारी नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘मिसेस देशपांडे’ सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं शूटिंग पूर्ण झालं असून कलाकारांसाठी एका खास व्रॅपअप पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्टीत ‘धकधक गर्ल’ने ‘डोला रे डोला’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
माधुरीच्या दिलखेचक अदा व डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरीने वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी तिच्या सहकाऱ्यांसह डान्स करत आहे.
दरम्यान, माधुरी दीक्षितने २०२२ मध्ये ‘द फेम गेम’ सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केलं होतं. आता अभिनेत्री ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमध्ये एक धाडसी भूमिका साकारणार आहे. फ्रेंच शोवर आधारित असणाऱ्या या सीरिजमध्ये माधुरी एका सिरीयल किलरची भूमिका साकारणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. आता ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.