बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. ‘तेजाब’, ‘खलनायक’, ‘दिल तो पागल हैं’, ‘देवदास’ अशा एकापेक्षा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करून माधुरीने बॉलीवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ९० च्या दशकातील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून तिची ओळख निर्माण झाली होती. करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने काही काळ मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. यानंतर बऱ्याच काळाने माधुरी भारतात परतली. सध्या ती मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.
माधुरीचे पती डॉ. नेने यांनी नुकतीच रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींबाबत खुलासा केला तसेच माधुरीबद्दल ते भरभरून बोलले. श्रीराम नेने सांगतात, “माधुरी अभिनेत्री सर्वांसाठी आहेच पण, माझ्यासाठी ती माझी जोडीदार आणि माझी पत्नी आहे. लग्नानंतर आपला जोडीदार हा खूप महत्त्वाचा असतो. कारण, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आपण एकमेकांना साथ देणं गरजेचं असतं.”
हेही वाचा : सोनाली कुलकर्णीने पाहिलं प्रिया-उमेशचं नवं नाटक ‘जर तरची गोष्ट’; प्रतिक्रिया देत म्हणाली, “आजच्या काळातलं…”
डॉ. नेने पुढे म्हणाले, “मला तिचा भूतकाळ माहिती नाही आणि तिलाही माझ्या भूतकाळाबाबत काहीच माहीत नाही. आमच्या दोघांचं प्रोफेशन सुद्धा खूप वेगळं आहे. पण, आमची कौटुंबिक पार्श्वभूमी सारखी होती. आम्ही दोघंही महाराष्ट्रातले त्यात आमची मातृभाषा एकच आहे. त्यातही मला असं वाटतं की, आपल्याला समजून घेणारा जोडीदार भेटला तर, आयुष्यात खूप गोष्टी सोप्या होतात. कारण, सरतेशेवटी आपलं एकमेकांशी असलेलं नातं किती घट्ट आहे हीच गोष्ट महत्त्वाची असते.”
“माधुरी खूप जास्त विनम्र आहे. ती तिच्या सगळ्या चाहत्यांशी प्रेमाने वागते. प्रत्येकाचा आदर करते. मला ही गोष्ट फार आवडते. आम्हाला आता दोन मुलं आहेत. प्रत्येकाच्या संसारात पालक ही जबाबदारी सर्वात मोठी असते आणि पालकत्व हा विषय अजिबातच सोपा नाहीये. लग्न, कुटुंब, उत्तम संसार या गोष्टी आपल्या चांगल्या आरोग्याला देखील कारणीभूत ठरतात. कारण, माणूस एकटा असेल तेवढा वाईट मार्गाकडे जातो. यावर अनेक तज्ज्ञांनी अभ्यास देखील केला आहे. त्यामुळे नेहमीच चांगली नाती जोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर होईल.” असं डॉक्टर श्रीराम नेनेंनी सांगितलं.
दरम्यान, माधुरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेले काही महिने अभिनेत्री ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत होती. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. याशिवाय माधुरी आणि डॉ. नेनेंची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.