Madhuri Dixit Husband Dr. Shriram Nene : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केलं. लग्नानंतर माधुरी अमेरिकेत राहण्यास गेली. तिचे पती त्यावेळी डेनवर येथे हृदयरोग शल्यचिकित्सक ( Cardiac Surgeon ) म्हणून कार्यरत होते. आता पती अन् सासरचे लोक परदेशात राहणारे असल्याने माधुरीचं भारतात येणं कालांतराने कमी होऊ लागलं. हळुहळू अभिनेत्री बॉलीवूडपासून दुरावली आणि संसारात रमली.

लग्नानंतर माधुरीला दोन मुलं झाली. मुलांच्या जन्मानंतर तिने इंडस्ट्रीपासून काही वर्षे ब्रेक घेतला. यानंतर २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आजा नचले’ सिनेमातून तिने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. तसेच, काही टेलिव्हिजन शोमध्ये माधुरीने परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आणि पुढच्या काही वर्षांतच ‘धकधक गर्ल’ कुटुंबीयांसह भारतात परतली. तिचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी अमेरिकेतील हार्ट सर्जनची नोकरी सोडून वैद्यकीय सल्लागार व उद्योजक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, ते २०११ मध्ये भारतात आले. हा निर्णय त्यांच्या आई-वडिलांना म्हणजे माधुरीच्या सासू-सासऱ्यांना पटला नव्हता. याबद्दल डॉ. नेने नेमकं काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…

डॉ. नेने सांगतात, “मी मूळचा भारतीय आहे. पण, लहानपणापासून दुसऱ्या देशात स्थलांतरीत नागरिक म्हणून वाढलो. तिथे मी हार्ट सर्जन म्हणून कार्यरत होतो…संसार नीट सुरू होता. त्यामुळे मी अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात परतणं हा निर्णय माझ्या आई-बाबांना पटला नव्हता. अगदी मी ज्या रुग्णालयात कामाला होतो तेथील प्रमुख, माझे अमेरिकेतील मित्र कोणीही या निर्णयामुळे आनंदी नव्हतं. पण, मी आधीच विचार केला होता. मी तिथे राहून वर्षातून ३-५ ते जास्तीत जास्त ५०० रुग्णांवर ओपन हार्ट सर्जरीची शस्त्रक्रिया करू शकलो होतो. पण, असंख्य लोकांसाठी सल्लागार बनणं हे माझं स्वप्न होतं.”

डॉ. नेने पुढे म्हणाले, “किशोरावस्थेत ( वयवर्ष १४ ) असतानाच मी उद्योजक म्हणून माझा प्रवास सुरू केला होता. पण, जसजसा मोठा झालो तसं पालकांनी अभियंता किंवा डॉक्टर होण्यास सांगितलं. मी १४ वर्षांचा असताना एका सॉफ्टवेअर कंपनीत तंत्रज्ञान उद्योजक म्हणून काम करत होतो. पण, करिअरसाठी डॉक्टर किंवा अभियंता बनणं हा एकमेव मार्ग असल्याचं वडिलांनी सांगितलं होतं. मी तसंच केलं…२० वर्षे डॉक्टरकी केल्यानंतर मला वेगळा मार्ग निवडायचा होता.”

“अनेक रुग्ण बरे होऊन, त्यांनी नवीन आयुष्य सुरू केल्याचं मी नेहमी पाहायचो. त्यांच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद मिळायचे. पण, या पृथ्वीतलावर समजा ७ अब्ज लोक आहेत जर, मी त्यांचीही काळजी घेतली तर किती छान होईल असे विचार मनात यायचे. पारंपरिक आरोग्य सेवा महत्त्वाच्या असतात पण, त्याच्या जोडीने आपण तंत्रज्ञानाच्या साथीने लोकांना घरबसल्या देखील अनेक माहिती पुरवू शकतो असा विचार माझ्या मनात आला. जेणेकरून प्रत्येकजण डॉक्टर आपल्या खिशात घेऊन फिरू शकेल.”

…अन् अमेरिकेतील नोकरी सोडली!

“२०११ मध्ये जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा माझे सहकारी नाराज झाले होते. मी क्लिनिकल हार्ट सर्जन म्हणून माझी नोकरी सोडली होती आणि त्यानंतर सर्वत्र नाराजीचा सूर होता. ‘तुम्ही काय करत आहात? आम्हाला तुमची इथे गरज आहे’ असं माझे सहकारी सतत सांगत होते. माझे कर्मचारी निराश झाले होते. माझे पालक या निर्णयापासून अजिबात खूश नव्हते. पण, हळुहळू मी आता जे-जे काही करतोय ते पाहून त्यांना हा निर्णय पटलेला आहे.” असं डॉ. नेनेंनी सांगितलं.

दरम्यान, डॉ. नेनेंचं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे. यावर ते अनेक हेल्दी रेसिपीजचे व्हिडीओ बनवून शेअर करत असतात. जेवणात तेलाऐवजी काय वापरावं? तेलाचं प्रमाण किती असावं, तुमच्या हृदयासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे? कोणच्या गोष्टी घातक आहेत? अशा अनेक विषयांवरची माहिती गृहिणींना डॉ. नेनेंचे व्हिडीओ पाहून मिळते.