Madhuri Dixit : ‘डर’ हा शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा आजच्याच दिवशी प्रदर्शित झाला होता. शाहरुख खानने या सिनेमात ग्रे शेडची भूमिका साकारली होती. २४ डिसेंबर १९९३ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने इतिहास घडवला. मात्र तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटातील किरण अर्थात जुही चावलाची भूमिका ही माधुरी दीक्षितला ऑफर झाली होती. मात्र माधुरीने या चित्रपटाला नकार दिला. जर माधुरीने होकार दिला असता तर किरण या मध्यवर्ती भूमिकेत जुहीऐवजी ती दिसली असती. माधुरीने चित्रपट का नाकारला? याचं कारण ३१ वर्षांनी समोर आलं आहे.
डरची निर्मिती कुठल्या चित्रपटावरुन झाली?
डर हा सिनेमा हॉलिवूडच्या Cape Fear या चित्रपटापासून प्रेरणा घेतलेला होता. यामध्ये शाहरुख खान (राहुल), सनी देओल (सुनील) जुही चावला (किरण) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र जुही चावला या सिनेमासाठी पहिली पसंती नव्हती. यश चोप्रांनी सुरुवातीला या भूमिकेसाठी श्रीदेवीला विचारलं होतं. तिने हा चित्रपट नाकारला. मग माधुरी दीक्षितकडे यश चोप्रा गेले. तिनेही नकार दिला. त्यानंतर हा चित्रपट दिव्या भारतीने साईन केला होता. पण दिव्या भारतीचा मृत्यू झाला. त्यानंतर जुही चावलाला संधी मिळाली.
या सिनेमाची सुरुवातीची स्टार कास्ट काय होती?
डर सिनेमात सर्वात आधी रविना टंडन, दीपक मल्होत्रा आणि साहील चढ्ढा हे तिघे काम करणार होते. पण यश चोप्रांना ही स्टार कास्ट आवडली नाही. त्यांनी आधी श्रीदेवीला विचारलं मग माधुरीला त्या दोघींनी नाही म्हटल्यावर हा चित्रपट दिव्या भारतीकडे आला. राहुलच्या भूमिकेसाठी पहिली पसंती आमिर खान होता. आमिर खानने विनंती केली की किरणची भूमिका जुहीला द्यावी. त्यानंतर ही भूमिका जुहीला मिळाली. या चित्रपटासाठी ऐश्वर्या रायची स्क्रीन टेस्ट झाली होती. पण भूमिका जुही चावलाला मिळाली. पुढे काही खटके उडाल्याने आमिरने चित्रपट सोडला. सुरुवातीला संजय दत्तला राहुलच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. पण आर्म्स अॅक्ट अंतर्गत त्याला अटक झाली. त्यानंतर सुदेश बेरी, अजय देवगण यांनाही विचारणा झाली. त्यांनी नाकारलेला चित्रपट अखेर शाहरुखला मिळाला. शाहरुखने या संधीचं सोनं केलं.
सनी देओलच्या पात्रासाठी कुणाला विचारणा झाली होती?
सनी देओलच्या पात्रासाठी म्हणजेच सुनीलच्या भूमिकेसाठीही ऋषी कपूर, मिथुन आणि जॅकी श्रॉफ यांना विचारणा झाली. त्यानंतर नितीश भारतद्वाजने ही भूमिका करण्यासाठी सहमती दर्शवली. पण कृष्णाच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला होता. त्यामुळे हा सिनेमा त्याला मिळाला नाही आणि तो सनी देओलकडे गेला. अशा पद्धतीने फायनल स्टार कास्ट ठरली ती सनी देओल, शाहरुख खान आणि जुही चावला. एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची भूमिका शाहरुखने यात केली आहे.
सिनेमाची कथा थोडक्यात काय?
किरण आणि राहुल हे कॉलेजपासूनचे मित्र असतात. किरण तिच्या भावाच्या घरी येते. तिथे तिला सुनील आवडतो. या दोघांचं प्रेम जुळतं आणि मग दोघांचं लग्न होतं. पण तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा राहुल तिचा कसा छळ करतो, तिच्यावर असलेलं प्रेम कसं व्यक्त करतो? या सगळ्याची ग्रे बाजू दाखवणारी भूमिका शाहरुखने साकारली. मात्र आता या चित्रपटात जुहीच्या जागी माधुरी का दिसली नाही? हे कारण ३१ वर्षांनी समोर आलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत, कॅमेरा वर्क सगळं उत्तम होतं.
काय म्हणाली माधुरी दीक्षित?
“होय, यश चोप्रांनी मला डर सिनेमा ऑफर केला होता. किरणची भूमिका मी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण मी डर सिनेमा नाकारला कारण मी आणि शाहरुख अंजाम चित्रपट करत होतो. डर आणि अंजाम चित्रपटातली भूमिका मला सारखीच वाटली. मला वाटलं की लोकांना ते आवडणार नाही त्यामुळे मी ती भूमिका नाकारली.” असं माधुरीने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखती सांगितलं आहे.