माधुरी दीक्षितने १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, सुरुवातीला या ‘धकधक गर्ल’ला सिनेविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पदार्पण केल्यावर तिचे सुरुवातीचे काही चित्रपट फ्लॉप गेले. मात्र, १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ने माधुरीला रातोरात स्टार बनवलं. यामध्ये तिने अनिल कपूर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. ‘तेजाब’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि यातील गाणी सर्वत्र लोकप्रिय झाली होती.
‘तेजाब’ सिनेमाचं नाव घेतल्यावर प्रत्येक सिनेप्रेमीला आपोआप माधुरी दीक्षितचं “एक दो तीन…” गाणं आठवतं. या गाण्यात तिने जबरदस्त डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हे गाणं अलका याग्निक यांनी गायलं असून, या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती. माधुरीने या सुपरहिट गाण्यावर डान्स करण्याआधी तब्बल १७ दिवस सराव केला होता असा खुलासा सरोज खान यांनी काही वर्षांपूर्वी केला होता.
सरोज खान म्हणाल्या होत्या, “माधुरी दीक्षित ‘तेजाब’मध्ये मुख्य भूमिकेत होती आणि मला ‘एक दो तीन…’ गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी बोलावण्यात आलं होतं. मी तिला सांगितलं, ‘या गाण्यासाठी तुला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण, हे गाणं एकतर तुझं करिअर घडवेल किंवा यापैकी काहीच होणार नाही.’ यावर माधुरी म्हणाली होती, ‘मास्टरजी मी इतकी मेहनत करेन की तुम्ही सुद्धा थकून जाल.’ मी म्हटलं ठिके चालेल, आपण हे गाणं करूयात.”
“मी शपथ घेऊन सांगते, ते गाणं मी अवघ्या २० मिनिटांमध्ये बसवलं. पण, तिथून पुढे माधुरीने तब्बल १७ दिवस त्या गाण्यासाठी सराव केला. आपण जसं मंदिरात जातो, तशी ती रोज सकाळी उठून यायची आणि संध्याकाळी ७ वाजता घरी जायची. पूर्ण दिवस डान्स करून सराव करायची. शेवटी दहाव्या दिवशी मी तिला सांगितलं, ‘तू एकदम व्यवस्थित करत आहेस. आता येऊ नकोस, मी आता ग्रुपकडून सराव करून घेते.’ त्यावर ती म्हणाली, ‘मी कोपऱ्यात उभी राहून नाचेन पण, इथे सराव करण्यासाठी नक्की येईन.’ आपल्या कामाशी ती खूप जास्त प्रामाणिक आहे. सराव केल्याशिवाय ती कधीच सेटवर जात नाही. आजकालच्या अभिनेत्री सराव करायला तयार होत नाहीत. अलीकडच्या काळात एकाच अभिनेत्रीने डान्सआधी सराव केला होता ती म्हणजे कंगणा रणौत. ‘तनु वेड्स मनु’ गाण्यासाठी तिने सराव केला होता.” असं सरोज खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
दरम्यान, सरोज खान यांना ‘मदर ऑफ डान्स’ या नावाने ओळखलं जायचं. त्यांचं मूळ नाव निर्मला नागपाल असं होतं. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. माधुरी आणि मास्टरजी सरोज खान यांची जोडी इंडस्ट्रीत खूप गाजली. दिग्गज नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं २०२० मध्ये निधन झालं.