Madhuri Dixit & Karan Johar : करिअरच्या शिखरावर असताना ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीचा विवाहसोहळा १७ ऑक्टोबर १९९९ रोजी कॅलिफोर्निया येथे पार पडला होता. ९० च्या दशकातील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून तिला ओळखलं जातं. त्या काळात कित्येकांची माधुरी क्रश होती. त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी समोर आल्यावर अनेकांचे हार्टब्रेक झाले होते.

बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला करण जोहरने त्याच्या मुलाखतीत, “तू एखाद्या हँडसम अभिनेत्याबरोबर लग्न का नाही केलंस?” असा प्रश्न विचारला होता. यावर माधुरीने काय उत्तर दिलं पाहुयात…

माधुरी दीक्षित लग्नानंतर काही वर्षे अमेरिकेत रमली. मात्र, दोन्ही मुलं मोठी झाल्यावर अभिनेत्रीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये माधुरी दीक्षित आणि जुही चावला या दोघी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

करणने या दोघींना, तुम्ही आजवर अनेक टॉपच्या अभिनेत्यांबरोबर काम केलेलं आहे. मग, तुम्ही त्यापैकी एखाद्या हँडसम अभिनेत्याशी लग्न का नाही केलं? असा प्रश्न विचारला. यावर माधुरी म्हणालेली, “मी आतापर्यंत सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान या सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. पण, मी यापैकी कोणाकडेच त्या दृष्टीने पाहिलं नाही. ते सगळे माझे सहकलाकाराच होते. पण, माझा नवरा…माझ्यासाठी खरा हिरो आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता मी कोणाकडेच हिरो म्हणून पाहत नाही,” ‘धकधक गर्ल’च्या या उत्तराने सर्वाचं मन जिंकून घेतलं होतं.

याशिवाय, जुही चावलाने १९९५ मध्ये बिझनेसमन जय मेहतांशी लग्नगाठ बांधली होती. तिने यावेळी सांगितलं की, “ग्रिटींग कार्ड्स, फुलं पाठवणं.. जय मेहतांनी माझे खूप लाड केले, मला पॅम्पर केलं. मला आजवर मी काम केलेल्या माझ्या सगळ्या हिरोंचा आदर आहे पण, मला वैयक्तिक आयुष्यात या क्षेत्रातला जोडीदार नको हवा होता. जोडीदारांचे स्वभाव आणि क्षेत्र वेगवेगळं हवं असं माझं मत आहे.” तसेच, नवऱ्याने पहिल्यापासूनच माझी खूप काळजी घेतलीये असंही अभिनेत्री जुही चावला या मुलाखतीत म्हणाली होती.

दरम्यान, जुही चावलाने तिच्या करिअरमध्ये ‘लुटेरे’, ‘आयना’, ‘डर’, ‘राम जाने’, ‘दीवाना मस्ताना’, ‘येस बॉस’, ‘इश्क’ अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.