माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी युट्यूबवर कौटुंबिक गप्पांचा व्हिडीओ शेअर करत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. बॉलीवूडचं ग्लॅमरस आयुष्य सोडून माधुरीने डॉ. नेनेंशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर अभिनेत्री अमेरिकेत राहायला गेली. मात्र, हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता. कारण, विदेशात राहायला गेल्यावर माधुरीला अनेक गोष्टी नव्याने समजल्या याशिवाय डॉ. नेने कामात व्यग्र असल्याने सुरुवातीच्या वर्षात अभिनेत्रीने एकटीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती.

डॉ. नेने कामावर असायचे तेव्हा माधुरीने पुढाकार घेऊन संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना डॉ. नेनेंसह सुरुवातीला सासरच्यांनी खूप मदत केल्याचं माधुरीने सांगितलं. माधुरी याबद्दल सांगते, “जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा तुम्ही फ्लोरिडामध्ये प्रशिक्षण घेत होतात. मला अजूनही आठवतं आपली भेटही व्यवस्थित व्हायची नाही. कारण, दिवसभर तुम्हाला रुग्णालयात खूप काम असायचं. रात्री सुद्धा क्वचितच घरी वेळेत येत होतात, याशिवाय घरी आल्यावर तुम्ही प्रचंड थकून जायचात. यामुळे अनेकदा तुम्ही नीट जेवलात सुद्धा नाहीत.”

यावर डॉ. नेने म्हणाले, “अमेरिकेत तुम्हाला पदवीधर होण्यासाठी चार वर्षे असतात. तुम्हाला या चार वर्षात अनेक गोष्टी शिकाव्या लागतात…प्रचंड काम असतं. याशिवाय वैद्यकीय शिक्षण व्यवस्थित घेऊन रुग्णालयीन जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. मी UCLA मध्ये जनरल सर्जरी चीफ रेसिडेन्सी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलं आणि तेव्हाच आमचं लग्न झालं. तो काळ माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होता. माझ्या फेलोशिपदरम्यान मी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे माधुरीला वेळ देता आला नव्हता.”

माधुरीशी संवाद साधताना डॉ. नेनेंनी तिला, “माझ्यासारख्या प्रोफेशनमधल्या माणसाबरोबर संसार करणं कठीण होतं का?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री नवऱ्याला उद्देशून पुढे म्हणाली, “हो, खरंच सुरुवातीची वर्षे खूप कठीण गेली. तुम्हाला तुमच्या कामाच्या वेळा नेहमीच फॉलो कराव्या लागायच्या. या सगळ्यात मुलांची जबाबदारी मी एकटीने सांभाळली. कारण, कामाच्या व्यापात कोणालाच कौटुंबिक वेळ देता येत नाही. हे मी समजून होते… अनेकदा घरात महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात पण, तुम्ही तिथे उपस्थित नव्हता कारण, तुम्ही रुग्णालयात तुमचं कर्तव्य बजावत असता. कधीकधी घरी मी आजारी असायचे पण, त्यावेळी सुद्धा तुम्हाला रुग्णालयात एक डॉक्टर म्हणून दुसऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी लागायची. मला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो. कारण, तुम्ही खूप चांगले आहात. पण, सुरुवातीची वर्षे मला खरंच कठीण वाटली होती.”

“मला ते नेहमी सांगायचे मला फक्त चार तास आराम करुदेत. त्यानंतर तू घराबाहेर पड, फिरून ये तोपर्यंत मी मुलांना सांभाळेन त्यांची काळजी घेईन. कारण, लग्नाआधी माझं आयुष्य कामावर अवलंबून होतं. त्यांनीही मला खूप समजून घेतलं आणि म्हणूनच मी म्हणेन लग्नानंतरच मी माझं खरं आयुष्य जगले.” असं माधुरीने सांगितलं.