९० च्या दशकात माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयासह दमदार नृत्याने सगळ्यांवर मोहिनी घातली होती. या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. तिला बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सध्या माधुरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
इन्स्टाग्राम रील्सवर अनेक गाणी व्हायरल होत असतात. सध्या आशा भोसले यांचं १९८३ मध्ये प्रदर्शित झालेलं “सलोना सा सजन है…और मैं हू” या गाण्याची नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे. अगदी माधुरीला सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. अभिनेत्रीने नुकताच या गाण्यावर ब्लॅक अँड व्हाइट व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा : पडद्यावर कोणाची भूमिका करायला आवडेल? शरद पवार यांचं नाव घेत प्रसाद ओक म्हणाला, “ते महाराष्ट्रातील…”
आशा भोसलेंच्या या जवळपास ४० वर्षे जुन्या गाण्यावर अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे. माधुरीने या व्हिडीओमध्ये इंडो-वेस्टर्न लूक करत साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या अदाकारीची केवळ नेटकऱ्यांनाच नव्हे तर मराठी अभिनेत्रींना देखील भुरळ पडली आहे.
माधुरीच्या व्हिडीओवर क्रांती रेडकरने “ओह माय गॉड तू खरंच बेस्ट आहेस” अशी कमेंट करत लक्ष वेधून घेतलं आहे. तर अमृता खानविलकरने या व्हिडीओवर कमेंट करत “उफ…ग्रेस” असं म्हटलं आहे. दरम्यान, माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अवघ्या एका दिवसात या व्हिडीओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.