Hum Aapke Hain Koun Movie : ‘हम आपके हैं कौन’ हा सिनेमा ५ ऑगस्ट १९९४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने प्रमुख भूमिका साकारली होती. ‘हम आपके हैं कौन’ प्रदर्शित होऊन ३० वर्षे पूर्ण झाली असली तरीही आजही यामधली गाणी, सगळे संवाद प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं होतं. पण, तुम्हाला माहिती आहे का, माधुरी दीक्षित या सिनेमासाठी पहिली पसंती नव्हती. दिग्दर्शकांनी नुकत्याच एक कार्यक्रमात याबद्दल खुलासा केला आहे.
‘हम आपके हैं कौन’चे दिग्दर्शक सूरज बडजात्या ‘इंडियन आयडल १५’ या शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी या सिनेमाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांना सांगितली. दिग्दर्शक म्हणाले, “करिश्माने मला ‘प्रेम कैदी’ सिनेमा दाखवण्यासाठी फोन केला होता. तो तिचा पहिला सिनेमा होता. मी तिचा चित्रपट पाहिला आणि घरी येऊन माझ्या वडिलांना सांगितलं की, मी करिश्माचा ‘प्रेम कैदी’ सिनेमा पाहिला. तिच्यात किती एनर्जी आहे. आता आपण ‘हम आपके हैं कौन’ लिहित आहोत तर, करिश्माला बोलावून पाहुयात. त्यावेळी वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली.”
सूरज बडजात्या पुढे म्हणाले, “बाबांनी मला सांगितलं की, करिश्मा अजून खूप लहान आहे. चित्रपटात मोहनीश यांच्या बाळाचा स्वीकार करण्यासाठी अभिनेत्री तिच्या प्रेमाचा त्याग करण्यास तयार आहे असा सीक्वेन्स आहे… हे आपण तिला कसं काय सांगू शकतो. एका लहान मुलीवर हे खूप मोठं ओझं आहे. म्हणूनच आपल्याला अशा व्यक्तीची गरज आहे जी तिच्या खांद्यावर ही जबाबदारी घेऊ शकेल.” दिग्दर्शकाचा खुलासा ऐकून करिश्मालाही आश्चर्य वाटलं, आपण वयाने थोडे मोठे असतो तर, कदाचित या भूमिकेसाठी संधी मिळाली असती अशा भावना यावेळी करिश्माने व्यक्त केल्या.
दरम्यान, ‘हम आपके हैं कौन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. यामध्ये सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, मोहनीश, अनुपम खेर, रीमा लागू, अलोकनाथ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.