बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनं तिच्या सुंदर हास्य, सौंदर्य आणि अभिनय यांद्वारे लाखो चाहत्यांना भुरळ घातली आहे. माधुरीला ‘धकधक गर्ल’ म्हणूनही संबोधलं जातं. माधुरीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. पण एकेकाळी अग्रगण्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी माधुरी लग्नानंतर मात्र बॉलीवूड सोडून नवऱ्यासह अमेरिकेत स्थायिक झाली. त्यानंतर बराच काळ भारताबाहेर राहिल्यानंतर तिनं तिच्या कुटुंबीयांसह भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि काही वर्षांपासून माधुरी तिचे पती डॉ. श्रीराम नेने व दोन मुलांसह भारतात राहत आहे.
त्यामुळे माधुरीसह तिचे पती डॉ. श्रीराम नेनेदेखील अनेकदा इंडस्ट्रीतील काही कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. माधुरीचे पती कार्डियाक सर्जन असून, ते सोशल मीडियामार्फत नेहमी यासंबंधित अपडेट्स शेअर करीत असतात. डॉ. नेने व माधुरी त्यांच्या यूट्यूब चॅनेलमार्फत वेगवेळे व्हिडीओज बनविताना दिसतात.
त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांच्या शेवटच्या वार्षिक आरोग्य तपासणीनंतर त्यांना असं आढळलं की, त्यांना त्यांच्या तब्येतीची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ते म्हणाले की, आरोग्य तपासणीनंतर माझे सहकारी मला ओरडले. “तुम्ही स्वत: डॉ असून आरोग्याकडे दुर्लक्ष कसं केलंत” असं म्हणाले. “त्यामुळे ९-१० महिन्यांपूर्वी मी मांसाहार करणं सोडलं, दारू पिणंही बंद केलं आणि विगन झालो.” त्यामुळे मी १८ किलो वजन कमी करू शकलो आणि याचा माझ्या शरीरावर चांगला परिणाम होत असल्याचे दिसू लागले. आम्ही सर्व प्रकारच्या चाचणी केल्या आणि मी स्वतःच माझा गिनीपिग (स्वतःवर वैद्यकीय प्रयोग करवून घेणारा माणूस) झालो”, असे डॉ. नेने यांनी स्पष्ट केले.
पुढे आरोग्याबद्दल बोलताना ते त्यांच्या वडिलांचा अनुभव सांगत म्हणाले, “माझ्या वडिलांच्या बाबतीतही मी असाच प्रयोग केला, ज्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. माझे वडील ५५ वर्षं डायबेटीजग्रस्त होते. पण आम्ही त्यांची सर्व औषधं बंद केली आणि त्यांच्यावर काही इतर वैद्यकीय प्रयोग केले, ज्यानंतर त्यांच्या आरोग्यामध्ये अजून सुधारणा झाल्याचे जाणवले. आज ते ८१ वर्षांचे असून, उत्तम आयुष्य जगत आहेत.माझ्या बाबतीतही मी असाच प्रयोग केला. सर्व गोष्टी बंद केल्या आणि आरोग्याकडे अधिक लक्ष दिले. आता मी १६ टक्के बॉडी फॅट्स कमी केले आहे.” एकंदरीतच त्यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.