अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘राम सेतु’ हा चित्रपट नुकताचा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. अक्षयच्या इतर चित्रपटांच्या मानाने या चित्रपटाला तसा बरा प्रतिसाद मिळाला आहे. काही कारणास्तव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, पण काही बदल करून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल १५ कोटीची कमाई केल्याचं वृत्त समोर येत आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे आकडे आणखी वाढतील अशी अपेक्षा आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे सोशल मिडीयावर चित्रपट आणि कलेसंदर्भात त्यांचं मत व्यक्त करत असतात. बऱ्याचदा वादग्रस्त चित्रपटांच्या विरोधातही त्यांनी भूमिका घेतली आहे. नुकताचा त्यांनी ‘राम सेतु’ चित्रपट पाहिला असून त्याबद्दलचं मनोगत त्यांनी मांडलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ पोस्ट करत नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटाचं आणि अभिनेता अक्षय कुमारचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा : ‘अनुपमा’ मालिकेमधील एंट्रीबद्दल सुप्रिया पिळगांवकर यांनी केला खुलासा; म्हणाल्या, “मला निर्मात्यांनी…”
नरोत्तम मिश्रा म्हणतात, “राम सेतु हा चित्रपट अद्भुत आणि अकल्पनिय आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट पाहायची मला संधी मिळाली. चित्रपटाच्या माध्यमातून राम सेतुच्या निर्माणामागील सत्य वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडलं आहे. ज्यांनी राम सेतु, रामायण आणि प्रभूश्रीराम यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचा प्रयत्न केला त्यांचे गैरसमज हा चित्रपट पूर्णपणे दूर करेल. हा पूल मानवनिर्मित आहे हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. अक्षय कुमार आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि सगळ्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट पाहायलाच हवा.”
नरोत्तम मिश्रा यांचा हा व्हिडिओ रीट्वीट करत अक्षय कुमारने त्यांचे आभार मानले आहेत. अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘राम सेतु’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. अक्षय कुमारबरोबर यामध्ये जॅकलीन फर्नांडिस, नुशरत भरूचा, नासर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.