प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभ(Maha Kumbh) मेळ्याला सुरूवात झाली आहे. भाविक भक्तीभावाने या मेळ्यात सहभागी होताना दिसत आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या महाकुंभमेळ्यात मनोरंजन विश्वातील काही प्रसिद्ध कलाकारांनीदेखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी महाकुंभ मेळ्यात हजेरी लावल्यानंतर काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गायक गुरु रंधावा(Guru Randhawa)ने प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात स्नान केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. याबरोबरच,या कुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीदेखील किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे.
गुरु रंधावाची कुंभ मेळ्याला हजेरी
लोकप्रिय गायक गुरु रंधावाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “प्रयागराज येथे गंगेत पवित्र स्नान करून धन्य झालो. जिथे श्रद्धा आणि अध्यात्म आहे. देवाच्या आशीर्वादाने माझा नवीन प्रवास सुरू करत आहे. हर हर गंगे!” गायकाने पहाटे फक्त नदीत स्थान केले नाही तर बोटीतून प्रवासही केला. त्याने संध्याकाळी आरतीला हजेरी लावली. याबरोबरच, चाहत्यांसह त्याने फोटोही काढल्याचे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
याआधी अभिनेते अनुपम खेर यांनीदेखील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली होती. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले होते की महाकुंभात गंगा स्नान करून जीवन सफल झाले. गंगा, जमुना आणि सरस्वती माता यांचा जिथे पहिल्यांदा संगम होतो, तिथे पोहोचलो. प्रार्थना करताना डोळ्यातून अश्रू वाहत होते. योगायोग म्हणजे, बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठादिनी असाच प्रकार घडला होता.
दरम्यान, महाकुंभमेळ्यात बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने देखील हजेरी लावली होती. अभिनेत्रीने संन्यास घेतल्याचे जाहीर केले. याबरोबरच, किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद धारण केले. ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यानंतर हा माझ्या गुरूंचा आदेश होता, असे म्हटले आहे. अभिनेत्रीच्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीला दिलेल्या पदावर प्रश्न निर्माण केल्याचे पाहायला मिळाले. जर एका महिलेला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद दिले असेल तर त्याचे नाव बदला, असे हेमांगी सखी यांनी म्हटले आहे.