आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या त्याच्या ‘महाराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने या सिनेमात साकारलेल्या भूमिकेचे सर्व प्रेक्षक, तसेच कलाकारांकडूनदेखील कौतुक होताना दिसत आहे. महाराज हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटातून आमिरच्या मुलाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे जुनैद खान चर्चांचा भाग बनले आहे. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या वडिलांच्या म्हणजेच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाविषयी भाष्य केले आहे.

जुनैदने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मी खरे तर ‘लाल सिंह चड्ढा’साठी ऑडिशन दिली होती. त्याबद्दल माझ्या वडिलांनी (आमिर खान) उघडपणे सांगितले आहे; पण तसे होऊ शकले नाही. गोष्टी हव्या तशा घडल्या नाहीत. माझे वडील तो चित्रपट करण्यासाठी फार उत्सुक होते. ‘महाराज’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये आमिर खानने जी भूमिका साकारली आहे, त्याच भूमिकेसाठी जुनैदने ऑडिशन दिले होते. पण गमतीचा भाग असा आहे की, त्याच ऑडिशनमुळे जुनैदची ‘महाराज’ चित्रपटासाठी निवड झाली. ती ऑडिशन मी आणि आदित्य चोप्राने पाहिली होती. जुनैदने त्यामध्ये कमालीचा अभिनय करीत आपण उत्तम अभिनेता असल्याचे सिद्ध केले होते. ऑडिशनची ती क्लिप कधी प्रदर्शित झाली, तर प्रेक्षकांसाठी ती पर्वणी असेल.

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात आमिर खानबरोबरच करीना कपूर, नागा चैतन्य व मोना सिंह हे मुख्य भूमिकांत दिसून आले होते. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: नितीश चव्हाणच्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत झळकणार ‘झी मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा, जाणून घ्या…

दरम्यान, महाराज हा चित्रपट सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केला असून, जुनैद खानच्या अभिनयाची चांगली चर्चा रंगताना दिसत आहे. ‘महाराज’ चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २१ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. सिनेमा आधी १४ जूनला प्रदर्शित होणार होता; पण चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणारा असू शकतो, असे म्हणत या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात मोठा विरोध होत होता. चित्रपटाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. चित्रपट पाहिल्यानंतर त्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याचा निवाडा न्यायमूर्ती संगीता विशेन यांनी दिल्यावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जुनैद खानबरोबर अभिनेत्री शालिनी पांड्ये मुख्य भूमिकेत अभिनय करताना दिसली आहे.