Chhaava Movie : सध्या बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई करत इतिहास रचला आहे. अवघ्या तीन दिवसांत १२१ कोटींची कमाई करत सिनेमाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात हाऊसफुल्ल शो सुरू आहेत, काही ठिकाणी सिनेमाच्या विशेष शोचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांनी देखील ‘छावा’चं कौतुक केलं आहे. याशिवाय गेल्या काही दिवसात क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, सिद्धार्थ चांदेकर, नेहा शितोळे यांनी हा सिनेमा पाहून पोस्ट शेअर केल्या होत्या. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अंशुमन विचारेने ‘छावा’ सिनेमा पाहिल्यावर खास व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

“नमस्कार, मी अंशुमन विचारे हा व्हिडीओ करण्याचं कारण असं की, कालच मी ‘छावा’ हा आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट पाहिला. या चित्रपटाबद्दल मी काही बोलेन एवढी माझी लायकी नाही. मी फक्त एवढंच सांगेन की, मी सर्वात आधी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचे मनापासून आभार मानेन. त्यांनी माझ्या राजाचा चित्रपट राजासारखा बनवला आणि त्यात विकी कौशलने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी भूमिका केलीये त्याबद्दल खरंच शब्द नाहीत. प्रत्येकाने खूपच अप्रतिम काम केलं आहे. पण, मुळात कामाबाबत बोलण्यापेक्षा तो चित्रपट प्रत्येक भारतीयाने पाहावा असा आहे. हा सिनेमा फक्त मराठी माणसांनी नाहीतर प्रत्येक भारतीयाने पाहावा… कारण, प्रत्येकाला कळालं पाहिजे की माझा राजा हा कसा होता आणि त्यांनी आपल्या जनतेसाठी काय केलंय, त्यांचं मन, ते काय ताकदीचे होते हे सिनेमा पाहून समजतं…आता मी फक्त एवढंच सांगेन महाराजांना मानाचा मुजरा!” असं सांगत अंशुमनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अंशुमनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत अभिनेत्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. सध्या सगळ्या थिएटर्समध्ये ‘छावा’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक शो संपल्यावर शिवगर्जना करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आता येत्या काही दिवसात ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर आणखी कोणते रेकॉर्ड्स करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.