दिग्दर्शक महेश भट्ट त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत त्यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच अनेक कलाकारांनाही त्यांनी बॉलिवूडमध्ये लाँच केलं. आपल्या चित्रपटांबरोबरच वादग्रस्त वक्तव्यामुळेदेखील ते चर्चेत असतात. ९० च्या दशकात आपल्या मुलीबरोसह लिप-लॉक करताना केलेल्या फोटोशूटमुळे तर महेश भट्ट हे आजही कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात.
बॉलिवूडमधील बडेबडे स्टार्स महेश भट्ट यांना आपला गुरु मानतात, तर सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा ही काहीशी वादग्रस्त आहे. काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस’ ओटीटीच्या घरातही महेश भट्ट यांच्या अशा एका वर्तणूकीमुळे चर्चेत आले होते. कलाकार आणि फिल्ममेकर यांनी काळानुसार बदलायला हवं आणि वयानुसार आपल्यात होणारे बदल स्वीकारायला हवेत याबाबतीत महेश भट्ट यांनी नुकतंच वक्तव्य केलं आहे.
‘दैनिक जागरण’शी संवाद साधताना महेश भट्ट म्हणाले, “प्रत्येक कलाकाराचा एक काळ असतो, त्यानंतर त्याच्या कारकीर्दीला उतरती कळा लागते. हा निसर्गाचा नियम आहे, यादरम्यान तो कलाकार आपला वारसा पुढच्या पिढीकडे सोपवतो. केवळ आपणच श्रेष्ठ आहोत असा विचार करणं एका ज्येष्ठ आणि समजूतदार कलाकाराला शोभत नाही.”
आपली मुलगी आलिया भट्टचा संदर्भ देत महेश भट्ट म्हणाले, “माझी मुलगी आलियासुद्धा माझं एक वाक्य कायम मला ऐकवते की आपल्याकडे लोक म्हातारे होतात पण परिपक्व होत नाहीत. आपले विचार आणि आपला दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो. वयानुसार आपल्यामध्ये होणारेबदलही स्वीकारायला हवेत आणि जर ते स्वीकारले नाहीत तर भविष्यात होणाऱ्या चुकांची जबाबदारी कोण घेणार?” सध्या महेश भट्ट हे चित्रपटसृष्टीत कार्यरत नसले तरी त्यांच्या नावाला आजही इंडस्ट्रीमध्ये वजन आहे.