अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका रणदीप हुड्डा साकारणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. रणदीपच्या हुड्डाच्या आधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर यांना देण्यात आली होती. परंतु, काही काळानंतर अचानक महेश मांजरेकरांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली. याबाबत त्यांनी नुकत्याच ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा : “ब्लू टिक विकत घे, नाहीतर…”, ट्विटर युजरच्या सल्ल्यावर हिना खानने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाली, “माझे आयुष्य…”
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून माघार का घेतली? याविषयी सांगताना महेश मांजरेकर म्हणाले, “सगळ्यात आधी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. परंतु, रणदीपने या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात होणाऱ्या बदलांमुळे मी हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतला.”
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “रणदीपने या भूमिकेसाठी प्रचंड अभ्यास केला होता. त्याचा रिसर्च पाहून मी खरंच प्रभावित झालो होतो. आम्ही अनेक विषयांवर एकत्र चर्चा केली. त्याने कथेचा पहिला ड्राफ्ट वाचल्यावर त्याने अनेक बदल सुचवले. दुसरा ड्राफ्ट वाचल्यावर सुद्धा तोच प्रकार घडला. एकंदर, रणदीपला त्याच्या मनासारखा चित्रपट बनवायचा होता.”
हेही वाचा : “आमच्या नाटकाची बस…”, टोलच्या समस्येनंतर मुंबई-पुणे महामार्गावर ऋजुता देशमुखला आला ‘असा’ अनुभव
“एक दिग्दर्शक म्हणून मला रणदीपने केलेली ढवळाढवळ मान्य नव्हती. त्याच्यासह मी माझ्या मताप्रमाणे काम करू शकलो नसतो. पुढे काही दिवसांनंतर माझी आणि निर्मात्यांची भेट झाली. आम्ही दोघेही एकत्र या प्रोजेक्टसाठी काम करू शकणार नाही हे मी निर्मात्यांना स्पष्टपणे सांगितले. एकतर रणदीप हुड्डा चित्रपटात असेल किंवा मी…माझा निर्णय मी कळवला. आता कदाचित निर्मात्यांनाही त्यांनी चुकीचा निर्णय घेतला याबद्दल पश्चाताप होत असेल.” असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. सध्या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांच्यातही चित्रपटाच्या कॉपीराइट्सवरून वाद सुरु आहेत.