Mahesh Manjrekar : १४ फेब्रुवारी रोजी विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. तरी सुद्धा अजूनही सगळीकडे त्याचीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला संपूर्ण देश भरातून चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

‘छावा’ बद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

‘छावा’बद्दल अनेक प्रेक्षक व कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरकरांनी केलेल्या ‘छावा’च्या व्यक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘मिर्ची मराठी’ ला दिलेलल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी ‘छावा’ या चित्रपटाला मिळालेल्या यशावर वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत त्यांनी विकीच्या अभिनयाचे कौतुक करत प्रेक्षक त्याला बघायला आले नसून त्याने साकारलेल्या भूमिकेला बघायला आल्याचे म्हटलं.

“विकी कौशलने असं म्हणू नये की, प्रेक्षक त्याला बघायला आले”

यावेळी महेश मांजरेकर विकीबद्दल असं म्हणाले की, “विकी कौशल हा खूप चांगला अभिनेता आहे. त्याच्या ‘छावा’ चित्रपटाने ८०० कोटींची कमाई केली. पण विकी कौशलने कधीच असं म्हणू नये की, प्रेक्षक त्याला बघायला आले. कारण असं असतं तर ते त्याचे आधीचे पाच चित्रपटही बघायला आले असते. प्रेक्षक त्याची भूमिका बघायला आले. त्याचे याआधीचे पाच चित्रपट नव्हतेच चालले. जोपर्यंत तो हा विचार करेल तोपर्यंत तो मोठा होईल. अभिनेता म्हणून तो चांगलाच आहे; पण ज्यावेळी अभिनेत्याला असं वाटतं की, तो एकटा चित्रपटगृहांत प्रेक्षक घेऊन येत आहे, तेव्हा तो अभिनेता संपतो.”

“‘छावा’ एकूण कमाईचं ८० टक्के श्रेय हे महाराष्ट्राला जातं”

यापुढे महेश मांजरेकर म्हणाले की, “आज हिंदी चित्रपटांची जी परिस्थिती आहे ती फारच दारुण आहे. म्हणजे माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे. आज ‘छावा’ चालला आहे; त्यापैकी ८० टक्के श्रेय हे महाराष्ट्राला जातं आणि त्या ८० टक्क्यांपैकी ९० टक्के पुणेला जातं. बाकीचं महाराष्ट्राला… त्यामुळे आज महाराष्ट्र इंडस्ट्री तारू शकतो. गेल्या काही दिवसांत बरेच चित्रपट चालले नाहीत. त्यातल्या त्यात ‘लापता लेडीज’ बऱ्यापैकी चालला. त्यामुळे आता वर्चस्ववादी कलाकारांना कळायला लागलं आहे की, ते कमाईचे आकडे गाठू शकत नाहीत.”

‘छावा’मध्ये अक्षय खन्ना, आशुतोष राणा यांच्या महत्त्वाच्या भूमिका

दरम्यान, लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं आहे. तर विकी कौशलनं चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. अभिनेत्री रश्मिका मंदानानं त्यांची पत्नी येसुबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. शिवाय चित्रपटात अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा यांच्यासह संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, आस्ताद काळे यांसारख्या मराठी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.