Mahesh Manjrekar : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता तो ओटीटीवरही दाखल झाला आहे. या चित्रपटातील विकीच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली. महाराष्ट्रासह भारतभर या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाचं अनेक समीक्षक, प्रेक्षक व कलाकारांकडून कौतुक झाले. अशातच अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘छावा’बद्दल आणि विकी कौशलबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
विकी कौशल आणि ‘छावा’बद्दल महेश मांजरेकरांचं मत
‘छावा’ या चित्रपटाने ८०० कोटींचा गल्ला जमवला. या एकूण कमाईमध्ये महाराष्ट्राचा ८० टक्के वाटा असल्याचे महेश मांजरेकर म्हणाले. त्या ८० टक्क्यांपैकीही पुण्याचा मोठा वाटा अधिक असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. ‘मिरची मराठी’शी बोलताना त्यांनी माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं असल्याचं म्हटलं. तसंच पुढे त्यांनी विकीच्या अभिनयाचे कौतुक करत प्रेक्षक त्याला बघायला आले नसून त्याने साकारलेल्या भूमिकेला बघायला आल्याचेही सांगितलं.
“‘छावा’ एकूण कमाईचं ८० टक्के श्रेय हे महाराष्ट्राला जातं”
याबद्दल महेश मांजरेकर म्हणाले की, “आज हिंदी चित्रपटांची जी परिस्थिती आहे ती फारच दारुण आहे. म्हणजे माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे. आज ‘छावा’ चालला आहे; त्यापैकी ८० टक्के श्रेय हे महाराष्ट्राला जातं आणि त्या ८० टक्क्यांपैकी ९० टक्के पुणेला जातं. बाकीचं महाराष्ट्राला… त्यामुळे आज महाराष्ट्र इंडस्ट्री तारू शकतो. गेल्या काही दिवसांत बरेच चित्रपट चालले नाहीत. त्यातल्या त्यात ‘लापता लेडीज’ बऱ्यापैकी चालला. त्यामुळे आता वर्चस्ववादी कलाकारांना कळायला लागलं आहे की, ते कमाईचे आकडे गाठू शकत नाहीत.”
“विकी कौशलने कधीच असं म्हणू नये की, प्रेक्षक त्याला बघायला आले”
यापुढे ते विकीबद्दल असं म्हणाले की, “विकी कौशल. खूप चांगला अभिनेता आहे. त्याच्या ‘छावा’ चित्रपटाने ८०० कोटींची कमाई केली. पण विकी कौशलने कधीच असं म्हणू नये की, प्रेक्षक त्याला बघायला आले. कारण असं असतं तर ते आधीचे पाच चित्रपटही बघायला आले असते. प्रेक्षक त्याची भूमिका बघायला आले. त्याचे याआधीचे पाच चित्रपट नव्हतेच चालले. जोपर्यंत तो हा विचार करेल तोपर्यंत तो मोठा होईल. अभिनेता म्हणून तो चांगलाच आहे, पण ज्यावेळी अभिनेत्याला असं वाटतं की, तो एकटा प्रेक्षक घेऊन येत आहे तेव्हा अभिनेता संपतो.”
‘देवमाणूस’मध्ये महेश मांजरेकरांसह रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके
दरम्यान, महेश मांजरेकर यांचा ‘देवमाणूस’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात महेश मांजरेकरांसह रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके हे कलाकार आहेत. ‘लव फिल्म्स’चे सादरीकरण असलेल्या ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.