पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शाहरुख खानबरोबर ‘रईस’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी घालण्यात आली. अभिनेत्रीने अलीकडेच या विषयासह तिच्या खासगी आयुष्य यांवर भाष्य केले आहे. माहिराने याच मुलाखतीत बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरबरोबर तिचे सिगारेट ओढतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतरच्या परिस्थितीवर वक्तव्य केले आहे.
‘बीबीसी एशियन नेटवर्क’शी संवाद साधताना माहिराने तिच्या आयुष्यातील संघर्षावर प्रकाश टाकला. ती म्हणाली, “घटस्फोट होणे, मूल असणे, इतके दिवस सिंगल राहणे, तसेच ते फोटो व्हायरल होणे आणि यासह दुसऱ्या देशात कामावर बंदी असणे… या सर्व गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या. हा खूप कठीण काळ होता.”
माहिराने सांगितले की, जेव्हा तिचे रणबीर कपूरबरोबरचे फोटो व्हायरल झाले, तेव्हा तिला वाटले की, तिचे करिअर संपले आहे. ती म्हणाली, “माझे आणि रणवीरचे न्यू यॉर्कमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर एका वृत्तपत्रानं ‘द लिटील व्हाइट ड्रेस’ नावाचा लेख प्रकाशित केला होता. त्या लेखात लिहिलं होतं की, पाकिस्तानातील मोठं यश मिळवणारी ती एकमेव महिला आहे, तिला प्रसिद्धी मिळाली, ती खूप लोकप्रिय झाली; पण आता हे सगळं संपलं आहे. तिचं पुढे काय होणार? मी तो लेख वाचला आणि मी विचार केला, अरे देवा! आता माझं करिअर संपणार का? पण नंतर मी स्वतःला समजावलं, तुला काय झालं आहे? हा वाईट काळ अन् लवकरच हे सर्व संपेल.”
माहिरा पुढे म्हणाली, “तो काळ खूप कठीण होता. मी बेडमधून उठत नव्हते. मी रोज रडत होते. याचा माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला. माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप काही घडलं.”
हेही वाचा…अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी स्टार्सच्या मानधनाबाबत व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “ते अभिनयापासून…”
माहिराने सांगितले की, त्या कठीण काळातही ती खंबीर राहिली. ती म्हणाली, “मी वैयक्तिक पातळीवर योग्य निर्णय घेतले. मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी योग्य निवडी केल्या. व्यावसायिक पातळीवर मी गप्प राहिले. कारण- त्या वेळी काहीही बोलणं मला शक्य नव्हतं. मात्र, सगळ्या ब्रॅण्ड्सनी मला पाठिंबा दिला.”
२०१७ मध्ये माहिरा आणि रणबीर कपूर यांचे फोटो व्हायरल झाले होते. न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर त्यांना सिगारेट ओढताना पाहून चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यावेळी अनेकांनी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत का, असा अंदाज व्यक्त केला होता.