अभिनेता पंकज त्रिपाठींचा बहुचर्चित चित्रपट ‘मैं अटल हूं’ चित्रपट १९ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठींनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने खूप कमी कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘मैं अटल हूं’ चे दोन ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. प्रेक्षकांकडून या ट्रेलर्सना भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केवळ १ कोटी रुपयांची कमाई केली होती.
मात्र, आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे बघायला मिळाले आहे. ‘सॅकनिल्क’ च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मैं अटल हूं’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २.९५ कोटींचा गल्ला जमवला आहे. शनिवारी चित्रपटाने केलेली कमाई पाहता रविवारीही ‘मैं अटल हूं’ चांगला व्यवसाय करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा- रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी मुख्य आरोपीला अटक
‘फाइटर’ चित्रपटाचा ‘मैं अटल हूं’च्या कमाईवर परिणाम होणार?
पुढच्या आठवड्यात म्हणजे २५ जानेवारीला सिद्धार्थ आनंदचा बहुप्रतिक्षित ‘फाइटर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन व दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फाइटर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘मैं अटल हूं’च्या कलेक्शनवर परिणाम होणयाची शक्यता आहे.