रेश्मा राईकवार

चरित्रपटांच्या म्हणून काही चौकटी आता प्रेक्षकांच्याही परिचयाच्या झाल्या आहेत. त्यातही अटलबिहारी वाजपेयींसारख्या धुरंधर आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या नेत्याच्या जीवनाचा समग्र वेध घ्यायचा तर ती केवळ त्यांची कथा वा जीवनप्रवास उरत नाही. तर साहिजकच ज्या भारतीय जनता पक्षाच्या मुहूर्तमेढीपासून किंबहुना या पक्षाच्या मूळ वैचारिक मांडणीच्या प्रवासापासून वाजपेयी जोडले गेले होते त्या राजकीय संघर्षांचा प्रवास, देशातील एकूणच सत्ताकारणातील महत्त्वाचे टप्पे असा फार मोठा पट लक्षात घ्यावा लागतो. दिग्दर्शक रवी जाधव यांनी हे भान राखून अटल निश्चयी असलेल्या एका प्रतिभावंत नेत्याचा जीवनप्रवास रंजक पद्धतीने मांडण्याचा उत्तम प्रयत्न ‘मैं अटल हूँ’ चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.

smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यावर ब्रिटिशांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न का केला होता?
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
reconstruction of 40 thousand row houses in navi mumbai news in marathi
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म ब्रिटिशकालीन भारतात झाला, ऐन तारुण्यात त्यांनी क्रांतीची धग अनुभवली असली तरी ते आणि समकालीन नेत्यांचे वैशिष्टय म्हणजे स्वतंत्र भारताची पहिल्यांदा जाणीव झालेली आणि कितीतरी वर्ष पारतंत्र्यात असलेल्या देशाने स्वातंत्र्याचा श्वास घेतल्यानंतर एक राष्ट्र म्हणून सुरू झालेली वाटचाल अनुभवणारी ही तरुण पिढी होती. ब्रिटिश भारत सोडून गेले, मात्र त्यांनी फाळणीची, हिंदू – मुस्लीम द्वेषाची जी बीजं रोवली त्याचा परिणाम देशाच्या विविध भागांतील लोकांवर वेगवेगळया प्रकारे झालेला पाहायला मिळतो. वाजपेयीही त्याला अपवाद नव्हते. ‘हिंदू तन मन’ ही त्यांची कविता चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही प्रसंगांत गाण्याच्या रूपात ऐकताना त्यांचं तरुणपण दिग्दर्शक रवी जाधव यांनी पडद्यावर दाखवलं आहे. वाजपेयी यांचा हा हिंदू विचार धर्माशी निगडित नव्हता. त्यांचा विचार राष्ट्राशी इमान राखणारा होता. आपल्या देशाचा, देशातील लोकांचा विकास, सगळयांना समान न्याय्य वागणूक हाच या विचारांचा गाभा होता आणि त्याच विचारातून वाजपेयी हेडगेवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. संघाचे कार्य, समांतररीत्या सुरू असलेले शिक्षण, त्यांची बहरत चाललेली साहित्यिक प्रतिभा आणि याच त्यांच्या कवितेतून, लेखणीतून संघाचा राष्ट्रविचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांना लखनौमध्ये बोलवून त्यांच्यावर ‘राष्ट्रधर्म’ या नियतकालिकाची सोपवण्यात आलेली जबाबदारी या सगळया कथाभागातून अटलबिहारी वाजपेयी यांची एक नेता म्हणून झालेली सामाजिक-वैचारिक जडणघडण पाहायला मिळते. इथे त्यांची प्रेमकथा, वडिलांशी असलेले नाते हे काही वैयक्तिक संदर्भही येतात. हा सगळाच पूर्वार्धातील भाग थोडा संथगतीने पुढे सरकतो, मात्र तो रंजक झाला आहे.

हेही वाचा >>> ‘मैं अटल हूं’ ची निराशाजनक सुरुवात, अटल बिहारी वाजपेयींच्या बायोपिकने पहिल्या दिवशी कमावले फक्त…

एका वळणावर हा चित्रपट पूर्णपणे त्यांच्या राजकीय प्रवासावर केंद्रित होतो. तेव्हा त्यात वाजपेयी यांच्याबरोबरीने वाढत गेलेला भारतीय जनता पक्ष आणि त्याचा प्रवास अधिक दिसतो. यात वाजपेयी यांनी पक्षाची मुहूर्तमेढ का केली? त्यांना आलेल्या अडचणी, नेता म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय, पक्षविस्ताराच्या घटना, पुढे मंत्रीपद, बाबरी मशीद, कारसेवा असे अनेकानेक महत्त्वाचे मुद्दे ते पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले पोखरण येथील अणूचाचणीपासून कारगिल विजयापर्यंतचे महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय हे सगळे विस्तारित स्वरूपात पाहायला मिळतात. मात्र उत्तरार्धातील या घटनाक्रमांच्या वेगात एक व्यक्ती म्हणून वाजपेयी यांच्या चरित्रात डोकावून पाहणारा धागा सुटत जातो. इथे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील संघर्ष अधिक अधोरेखित होत गेला आहे, इंदिरा गांधी यांच्याबाबतीत एकंदरीतच असलेला विरोध, त्यांच्या वागण्या-बोलण्यापासून निर्णयांपर्यंत सगळयाच बाबतीत असलेला टीकेचा सूर या सगळया गोष्टी मांडताना हा विरोध पक्षाची एकूण ध्येयधोरणे आणि सत्ताकारणाच्या खेळातून आलेला भाग होता. इथे मुळातच या सत्ताकांक्षी प्रवृत्तीच्या विरोधी स्वभाव असलेल्या वाजपेयी यांची वैयक्तिक घालमेल, त्यांचे बदलत गेलेले विचार, बाबरी मशीद अध्यायानंतर राजकारणापासून दूर गेलेले वाजपेयी पडद्यावर दिसतात, मात्र त्यात अधिक खोलवर उतरता येत नाही. एक चरित्रपट मांडत असताना संबंधित व्यक्तीच्या आयुष्यातील नेमकी कोणती गोष्ट आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे याबद्दलचा लेखक – दिग्दर्शकाचा विचार पक्का आहे आणि ते या चित्रपटाच्या मांडणीतून ठायी ठायी जाणवतं. नावाप्रमाणेच अटल निश्चयाने आपले अवघे जीवन राष्ट्रसेवेसाठी देणाऱ्या वाजपेयी यांचा हा चरित्राध्याय त्यांच्या या खंबीर राष्ट्रविचारांची बाजू अधोरेखित करतो. त्याला चित्रपटातील कलाकारांच्या उत्तम अभिनयाची जोड मिळाली आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठीच आपला जन्म झाला असावा जणू इतक्या समरसतेने अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी ही भूमिका केली आहे. या चित्रपटात इतर कितीतरी महत्त्वाच्या व्यक्तिरेखा असल्या आणि त्या उत्तम कलाकारांनी साकारल्या असल्या तरी पंकज त्रिपाठी यांनी अटलबिहारी वाजपेयींचे विचार, त्यांचे व्यक्तित्व इतक्या सहज आणि प्रगल्भरीत्या अभिनयातून उभे केले आहे की एक त्यांचाच प्रभाव आपल्यावर कायम राहतो. हेडगेवारांच्या छोटेखानी भूमिकेत अभिनेता अजय पूरकर भाव खाऊन जातात. मात्र हा संपूर्ण चित्रपट पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाने तोलून धरला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या समतोल व्यक्तित्व असलेल्या खंबीर, धोरणी नेत्याचं चरित्र आणि त्या ओघात देशाच्या राजकीय इतिहासातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची उजळणी करणारा ‘मैं अटल हूँ’ हा चित्रपट आत्ताच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत महत्त्वाचा अनुभव ठरला आहे.

‘मैं अटल हूँ’ दिग्दर्शक – रवी जाधव, कलाकार – पंकज त्रिपाठी, अजय पूरकर, पीयूष मिश्रा, दयाशंकर पांडे, पायल नायर, राजा रमेशकुमार सेवक, प्रमोद पाठक.

Story img Loader