दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी(Sridevi) यांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. हिंदीसह त्यांनी तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘नगीना’, ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘लाडला’, ‘सुहागन’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असत. आता ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवी यांच्यावरील एका खटल्याबाबत वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेव्हा मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर गेली….

अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांमध्ये ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी अनेक बॉलीवूडच्या कलाकारांचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या ५० वर्षांच्या कारकि‍र्दीबद्दलची माहिती देणारे ‘माय मेमोयर्स’ (My Memoirs) नावाचे आत्मचरित्र माजिद मेमन यांनी प्रकाशित केले आहे. त्यांच्या या पुस्तकात माजिद मेमन यांनी अनेक बॉलीवूड कलाकारांशी संबंधित खटल्यांबद्दल वक्तव्य केले आहे.

माजिद मेमन यांनी नुकताच स्क्रीनबरोबर संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, अनेक कलाकारांशी संबंधित खटल्यांबाबत पुस्तकात लिहिले आहे. मात्र, एका खटल्याचा पुस्तकात उल्लेख केला नाही. हा खटला दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासंबंधित होता. त्यांनी या केससंबंधी फार गोष्टी उघड केल्या नाहीत. मात्र, त्यांनी म्हटले की अभिनेत्री श्रीदेवी यांना न्यायालयात यासाठी बोलावण्यात आले होते, कारण न्यायाधीशांना श्रीदेवी यांना समोरासमोर पाहायचे होते.

याबद्दल अधिक बोलताना त्यांनी म्हटले, “एकदा मी एका केसमध्ये श्रीदेवीची बाजू मांडत होतो, त्यावेळी ती इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर होती. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे. इतकेच नाही तर न्यायाधीशदेखील तिला पाहण्यासाठी उत्सुक होते. मी सवलत मिळावी यासाठी अर्ज केला, पण तो मंजूर झाला नाही. न्यायाधीशांनी मला माझ्या अशि‍लाला उपस्थित करायला सांगितले, कारण ते श्रीदेवीला पाहण्यासाठी उत्सुक होते. जेव्हा श्रीदेवी न्यायालयात आली तेव्हा मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती”, अशी आठवण माजिद मेमन यांनी सांगितली.

याबरोबरच, माजिद मेनन यांनी त्यांच्या पुस्तकात अनुपम खेर आणि सुनील दत्त यांनी दाखल केलेला बदनामीचा खटला, गुलशन कुमार यांच्या हत्येचे प्रकरण; यासह इतरही अनेक खटल्यांबद्दल माहिती दिली आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त यांची बाजूदेखील मेमन यांनीच न्यायालयात मांडली होती. मेमन यांनी तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक काळ होता असेही नमूद केले आहे. या पुस्तकात त्यांनी बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे कनेक्शन तसेच एखादे ठराविक प्रकरण प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी अभिनय क्षेत्रातील कलाकारांची नावे अनेकदा वापरली गेली, याबद्दलही भाष्य केले आहे.

मेमन यांनी त्यांच्या पुस्तकात शाहरुख खान आणि सलमान खान हे भारत शाह प्रकरणात विरोधी पक्षाचे साक्षीदार झाल्याचा उल्लेख केला आहे. पुस्तकात बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांची नावे घेतल्याने त्याचे काही परिणाम भोगावे लागू शकतात. त्यांची नावे घेताना भीती वाटत नाही का? असे विचारले असता माजिद मेमन यांनी म्हटले की, “मला शाहरूख खान किंवा सलमान खान यांची नावे घेण्याची भीती कधीच वाटली नाही. मी फक्त इतकेच म्हणालो आहे की, केस प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत.”

दरम्यान, श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ ला निधन झाले. आता त्यांच्या मुली जान्हवी व खुशी कपूर बॉलीवूडमध्ये काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.