Makrand Anaspure on Chhaava Movie: विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. एका आठवड्यापूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत भारतात २०० कोटींहून आणि जगभरात ३०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. हा चित्रपट मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी कुटुंबाबरोबर पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर ते काय म्हणालेत, जाणून घेऊयात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीचे औचित्य साधून मकरंद अनासपुरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट कुटुंबाबरोबर पाहिला. त्यांनी चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले आहे.

मकरंद अनासपुरे चित्रपट पाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘छावा’ चित्रपटाबद्दल म्हणाले, ”अलीकडच्या काळात इंग्रजी शाळांचं पेव फुटलेलं असताना आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या मातीविषयी, आपल्या वीरांविषयी सगळ्यांना माहिती असणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील तमाम आई-वडिलांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना हा सिनेमा आवर्जून दाखवा. मी गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या बातम्या ऐकतो आहे. काही हिंदी भाषिक मित्रांच्या प्रतिक्रियाही ऐकल्या की आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला गेला नाही? मला असं वाटतं की, सध्याच्या काळात समाजात जातीपाती विसरून एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी हा चित्रपटही योग्य भुमिका बजावेल याची मला खात्री आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही करून ठेवलंय, त्याचं काय करायचं हा सर्वस्वी प्रश्न आपल्या सर्वांचा आहे.”

पुढे ते म्हणाले, ”आपण सजगतेनं, सवंदेनशिलतेनं हा चित्रपट पाहणं, तो समजून घेणं, इतिहासाची मोडतोड न करता, त्याचं विकृतीकरण न करता, त्याविषयी विचित्र भाष्य न करता आपण सर्वांचा अभिमान, आपण धर्मरक्षक संभाजी महाराज म्हणतो, धर्मासाठी ज्यांनी प्राण त्यागले, त्यांचा धगधगता इतिहास या चित्रपटाने मांडला आहे, त्याबद्दल मी दिग्दर्शक उतेकर यांचे अभिनंदन करतो. विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना व सर्व मराठी मातब्बर मंडळींचे मी अभिनंदन करतो.”

Chhaava worldwide Box Office Collection 1
छावा चित्रपटाचे पोस्टर (सौजन्य – इन्स्टाग्राम)

आपण सगळ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज – मकरंद अनासपुरे

जातीयवादाचा उल्लेख करत मरकंद अनासपुरे म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात जातीय वातावरण कलुषित करण्याचं जे काम होतंय, त्यामध्ये हा सिनेमा निश्चितच एक उत्तम मलमाचं काम करेल, याची मला खात्री आहे. आपला हा इतिहास जपला पाहिजे आणि सोबतच हा इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. मध्यंतरी कोल्हापूरच्या संभाजी छत्रपतींनी जी सूचना केली फार महत्त्वाची वाटली. महाराष्ट्रातील जे मातब्बर इतिहास संशोधक, अभ्यासक आहेत त्यांनी अभ्यासपूर्ण एक शिवचरित्र लिहावं आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावं, त्यामुळे इतिहासाची जी मोडतोड होते किंवा त्याविषयी हलक्या दर्जाची विधानं करण्याची सवय मोडीत निघेल, अशी अपेक्षा आहे. मी खासकरून हा चित्रपट पाहिल्यावर लहान मुलांना ढसाढसा रडताना पाहिलं तेव्हा समाधान वाटले की, कशाप्रकारे आपला इतिहास हा जाज्वल्यपणे आपल्यासमोर येतो आहे. सिनेमा म्हणून याचा व्यवसाय किती होईल हे महत्त्वाचे नाही परंतु या निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.”

Story img Loader