फिल्म प्रॉडक्शन बॅनर टी-सीरीजने बुधवारी सुपरहिट चित्रपट ‘यारियां’च्या सिक्वेलची घोषणा केली आहे. २०१४ साली आलेल्या यारियां चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण सिक्वलमध्ये मात्र तेच कलाकार दिसणार नाहीत. सिक्वलमध्ये दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि यश दास गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असतील.
टी-सीरिजने यारियां-२ ची घोषणा ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट शेअर करत केली. यावेळी निर्मात्यांनी या चित्रपटातील कलाकारांची आणि रिलीज डेटची घोषणा केली. हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “नात्याने कझिन्स, पण एकमेकांचे मित्र! खऱ्या मैत्रीच्या बंधनाने जोडलेले एक कुटुंब तुमच्याकडे परत घेऊन येत आहोत. यारिया-२ १२ मे २०२३ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात,” असं कॅप्शन देत एक पोस्टर शेअर करण्यात आलंय.
यारियां चित्रपटात हिमांश आणि रकुल प्रित सिंगच्या मुख्य भूमिका होत्या, तर दिव्या खोसला कुमारने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. परंतु सिक्वलमध्ये दिव्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित करतील. राधिका राव आणि विनय सप्रू ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात.