करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला, हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता आणि अजूनही प्रेक्षकांच्या मनात यासाठी एक खास जागा आहे. चाहत्यांनी अनेकदा चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी केली होती. दरम्यान, आता या चित्रपटाशी संबंधित नवीन माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जब वी मेट’च्या सिक्वेलवर लवकरच काम सुरू होणार आहे. ‘अष्टविनायक फिल्म्स’चे मालक राज मेहता यांनी नुकतंच या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. पहिला भाग दिग्दर्शित करणारे इम्तियाज अलीच या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी वाचा : “मी जरा आळशी…” इंग्रजी नाटकं अन् साहित्याच्या अडॅप्शनबाबत विशाल भारद्वाज स्पष्टच बोलले
अद्याप निर्मात्यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली नसली तरी मीडिया रीपोर्टनुसार शाहिद कपूर व करीना कपूर यांनी या सिक्वेलसाठी होकार दिला असून लवकरच हे दोघे ‘गीत’ आणि ‘आदित्य’ या लोकप्रिय पात्रांच्या रूपात लोकांसमोर येणार असल्याची चर्चा आहे.
याचवर्षी ‘जब वी मेट’ काही चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी शाहिद कपूरने या चित्रपटाच्या सिक्वेलवर भाष्य केलं होतं. चित्रपटाची स्क्रिप्ट कशी असेल यावर सगळं अवलंबून असल्याचं शाहिदने सांगितलं होतं. आजही प्रेक्षकांच्या मनात शाहिद व करीनाच्या या ‘जब वी मेट’ची जागा कोणताही चित्रपट घेऊ शकलेला नाही. त्यामुळे याच्या सिक्वेलसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.