बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे जो वर्षाला किमान ५ ते ६ चित्रपट करतो. अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. मात्र सध्या त्याचे अनेक चित्रपट एकामागून एक फ्लॉप होताना दिसत आहे. त्यामुळे आता त्याच्या ‘रावडी राठोड’ या चित्रपटाच्या पुढील भागातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
२०१२ साली अक्षय कुमारचा ‘रावडी राठोड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटातील अक्षय कुमारचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला. हा चित्रपट हिट झाला आणि त्या पाठोपाठ आता या चित्रपटाच्या सिक्वेल निर्माते काम करत आहेत.
सध्या या चित्रपटाच्या कथेवर निर्मात्यांचे काम सुरू आहे. तर त्याचबरोबर या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी सिद्धार्थ मल्होत्राला विचारणा केली आहे. इतकंच नाही तर सिद्धार्थने देखील हा चित्रपट करण्यात रस घेतला आहे. या चित्रपटाबाबत निर्माते यांची सिद्धार्थ मल्होत्राशी बोलणी सुरू आहेत. निर्मात्यांच्या प्लॅन नुसार या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल.
आता निर्मात्यांनी या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्राला विचारणा केल्याचं समोर आल्यानंतर या चित्रपटात तो अक्षय कुमारची जागा घेणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण ‘रावडी राठोड २’मध्ये अक्षय आणि सिद्धार्थ एकत्र दिसणार की अक्षयची जागा सिद्धार्थ घेणार हे येत्या काय दिवसांतच स्पष्ट होईल.