मलायका अरोरा व अरबाज खान काही वर्षांपूर्वीच एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर दोघंही त्यांच्या आयुष्यामध्ये व्यग्र झाले. मलायका अर्जुन कपूरला डेट करत असल्याचं उघडपणे दिसून आलं. तर अरबाजही त्याची गर्लफ्रेंड जॉर्जियाबरोबर सुखी आहे. मलायका-अर्जुन नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. त्यांचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होतात. पण या दोघांनी कधीच आपल्या नात्याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. पण आता मलायकाने सोशल मीडियाद्वारे शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”
मलायका व अर्जुनच्या नात्याची बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चा रंगताना दिसते. या दोघांच्या वयामध्ये १२ वर्षांचं अंतर आहे. यावरूनही मलायका-अर्जुनला बरंच ट्रोल करण्यात आलं. दोघांच्या नात्याच्या चर्चा सतत रंगत असताना मलायकाने आता आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायका लाजताना दिसत आहे. फोटो शेअर करत तिने म्हटलं की, “मी होकार दिला.” तिच्या या पोस्टनंतर तिने अर्जुन कपूरलाच होकार दिला असल्याचं बोललं जात आहे. तसेच हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार की काय अशी नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
मलायकाने हि पोस्ट शेअर करताच कमेंटच्या माध्यमातून अनेक जण तिला अभिनंदन करत आहेत. तर काही सेलिब्रिटी मंडळींनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आता मलायका व अर्जुन लवकरच विवाहबंधनात अडकणार का? की मलायकाची पोस्ट कोणत्या प्रमोशनचा भाग आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.