मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्रीच्या टीमने याबाबत मोठी अपडेट दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेलं हे नात संपुष्टात आलं असल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. आता मलायका अरोराच्या मॅनेजरने याबद्दल खुलासा केला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा मलायकाच्या मॅनेजरला या कपलच्या ब्रेकअपबद्दल विचारण्यात आलं तेव्हा मॅनेजर म्हणाला, “नाही नाही, या सगळ्या अफवा आहेत.”
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या अनेक सूत्रांनी असं सांगितलं होतं की, या जोडप्यानं आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या एका सूत्राने असंही सांगितलं होतं की, “मलायका आणि अर्जुनचं नातं खूप खास होतं आणि ते दोघंही एकमेकांच्या हृदयात त्यांचं विशेष स्थान कायम ठेवतील. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि या प्रकरणी त्यांनी सन्माननीय मौन पाळलं आहे. त्यांच्या नात्याबद्दल वाईट साईट बोलण्याची ते कोणालाही परवानगी देणार नाहीत.”
अर्जुन आणि मलायकाच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं, तर अर्जुन आणि मलायकाने जेव्हा २०१८ मध्ये एका फॅशन शो कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती, तेव्हा त्यांच्या नात्याच्या अफवा सुरू झाल्या होत्या. अखेरीस मलायकाच्या ४५व्या वाढदिवशी त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची पुष्टी केली. अधिकृत केल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवायला सुरुवात केली. ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये एकदा अर्जुनने त्यांच्या नात्याला आता एक सुंदर वळण देण्याबाबतही भाष्य केलं होतं.
मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झाल्यास, १९९८ साली मलायका अरोरा आणि अरबाज खान लग्नबंधनात अडकले होते. १९ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अभिनेत्रीने अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली.
हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा पत्नीबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले, “तुझीच बायको…”
दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. करीना कपूर, दीपिका पदुकोण, अजय देवगण, रणवीर सिंग अशी तगडी स्टार कस्ट या चित्रपटाला लाभली आहे, तर आगामी चित्रपट ‘नो एन्ट्री-२’ मध्येदेखील अर्जुन झळकणार आहे; तर मलायका रिअॅलिटी शो आणि ब्रॅंड एंडोर्समेंट अशा कामांमध्ये व्यग्र आहे.