कलाकार आणि चाहत्यांचं एक अनोखं नातं असतं. कलाकारांबरोबर अनेकदा त्यांच्या चाहत्यांचे भन्नाट किस्से घडत असतात. त्यातले काही किस्से अगदीच मजेशीर असतात. पण चाहत्यांच्या अतिप्रेमामुळे अनेकदा कलाकारांना त्रासाला सामोरं जावं लागतं. तसंच काहीसं झालं होतं बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराबरोबर. अभिनेत्री तिच्या खोलीत तयार होत असताना एक महिला चाहती तिच्या खोलीत अचानक आली होती.

अभिनेत्री मलायका अरोरा कायमच तिच्या स्टाईल, डान्समुळे चर्चेत राहत असते. एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्तम नृत्य दिग्दर्शकही आहे. त्याशिवाय ती शोजचे परीक्षणही करते. तसेच चित्रपटांमधील तिच्या गाण्यांना चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. सध्या ती डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षण करीत आहे. ‘हिप हॉप इंडिया’ शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. अशातच मलायकानं तिच्या चाहतीचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. ‘बॉलीवूड बबल’शी साधलेल्या संवादात तिनं हा किस्सा सांगितला.

या संदर्भात मलायकानं सांगितलं की, ती एकदा तयार होत असताना तिच्या खोलीत एक अनोळखी महिला बसली असल्याचं तिला दिसलं. त्याबद्दल तिला काहीही माहीत नव्हतं. त्यामुळे मलायका थोडी घाबरली. ती महिला फक्त बसली होती आणि तिच्या हातात कात्री किंवा काहीतरी भयानक होतं. त्यामुळे अभिनेत्रीनं त्यावेळी शांत राहण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या घटनेदरम्यान ती खूप घाबरली होती आणि नेमकं काय करावं हे तिला कळलं नव्हतं.

त्याबद्दल मलायका म्हणाली, “मला आठवतंय मी वरच्या मजल्यावर माझ्या खोलीत तयारी करत होते आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तिथे कोणीतरी बसलं होतं. मला काहीच कळत नव्हतं, मी खूप घाबरले होते. ती व्यक्ती फक्त बसलेली होती आणि ती फक्त, “मी खूप प्रामाणिकपणे सांगते की, मी खूप घाबरले आहे” हे सांगायला आली होती.

मलायका पुढे म्हणाली, “ती फक्त एक वेडी चाहती होती; पण तिच्या बॅगेत कात्री किंवा काहीतरी भयानक अशी गोष्ट होती. म्हणून मला वाटलं की, काहीतरी गडबड आहे. म्हणून मी त्यावेळी फक्त शांत राहण्याचा प्रयत्न केला. ती फक्त माझी एक वेडी चाहती होती. त्यामुळे चाहतीचा हा एक भयानक किस्सा माझ्याबरोबर घडला होता”.

दरम्यान, मलायका अरोरा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अर्जुन कपूरबरोबरच्या ब्रेकअपनंतर मलायकाच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात मलायका राजस्थान संघाला पाठिंबा देताना दिसली .

यावेळचा संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा आणि मलायका अशा दोघांचा एकत्र फोटो व्हायरल होत आहे. त्यानंतर तिच्याबद्दल अफवांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अर्थात, याबद्दल अभिनेत्रीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या फक्त चर्चाच असल्याचं म्हटलं जात आहे.