बॉलीवूडमध्ये अनेक अशी भावंडं आहेत, ज्यापैकी एकाला खूप यश मिळालं तर तुलनेत दुसऱ्याला कमी यश मिळालं. बॉलीवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृतादेखील अशाच भावंडांपैकी एक. आपल्या फॅशन व गाण्यांमुळे मलायकाने खूप लोकप्रियता मिळवली. पण अमृताला चित्रपटांमध्ये काम करूनही तिच्याइतकं यश मिळालं नाही. अमृताचं इंग्लंडसाठी खेळणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूशी अफेअर होतं, नंतर तिने मैत्रिणीच्याच पतीशी लग्न केलं होतं.
अमृता अरोराने तिची बहीण मलायकाप्रमाणेच व्हिडीओ जॉकी म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून अमृताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, परंतु तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने ‘गर्लफ्रेंड’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘कंबख्त इश्क’ या चित्रपटांमध्येही काम केलं, पण अमृता तिच्या अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली.
टायगरच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल वडील जॅकी श्रॉफ यांचे विधान; म्हणाले, “मी शेंगदाणे विकून…”
२००४ मध्ये अमृता अरोराचे पाकिस्तानमध्ये राहणारा इंग्लंडचा क्रिकेटर उस्मान अफजलशी अफेअर असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उस्मान क्रिकेट मॅच खेळण्यासाठी भारतात आला होता आणि इथेच त्याची अमृताशी भेट झाली, त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. एका मुलाखतीत अमृताने कबूल केलं होतं की तिचं उस्मानवर प्रेम होतं. उस्मानमुळेच तिला क्रिकेट आवडू लागले. उस्मान भारतातील अतिशय हाय-प्रोफाइल पार्टीजमध्ये जात असे, अमृताही तिथे जायची. त्यावेळी उस्मानचा भाऊ बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करत होता आणि अमृता त्याला मदत करत होती.
प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?
अमृताने २००९ मध्ये बिझनेसमन शकील लडकशी लग्न केलं. खरं तर शकील हा अमृताचा कॉलेजच्या दिवसांपासूनचा मित्र होता पण नंतर त्यांचा संपर्क तुटला आणि शकीलने निशा नावाच्या तरुणीशी लग्न केलं. अमृता व निशा मैत्रिणी होत्या. मात्र, २००५ साली अमृताची शकीलशी पुन्हा मैत्री झाली. यानंतर शकीलच्या पहिल्या लग्नात समस्या होऊ लागल्या. २००८ मध्ये शकीलने पत्नी निशाला घटस्फोट दिला आणि वर्षभरानी अमृताशी लग्न केले. घटस्फोटानंतर निशाने अमृतावर अनेक आरोप केले होते. अमृतामुळेच तिच्या आणि शकीलच्या नात्यात समस्या आल्या, असा दावा निशाने केला होता. मात्र शकील आणि अमृताने एका भव्य सोहळ्यात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.
अमृता आणि शकीलने तीन धर्मांच्या पद्धतीनुसार लग्न केले होते. अमृताचे पहिले लग्न ख्रिश्चन धर्मानुसार चर्चमध्ये झाले. यानंतर त्यांनी मुस्लिम परंपरेनुसार लग्न केले आणि नंतर पंजाबी परंपरेनुसार लग्नही केले होते. अमृता अरोरा आणि शकील लडाक यांना अझान आणि रायान नावाची दोन मुलं आहेत.