ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाकुंभ मेळ्यात तिने काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती, त्यानंतर संन्यास घेतल्याचे घोषित केले होते. महत्त्वाचे म्हणजे, याचदरम्यान तिला किन्नार आखाड्याचे महामंडलेश्वर पद बहाल करण्यात आले होते. मात्र, ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. एका महिलेला जर किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर हे महत्त्वाचे पद देण्यात येत असेल तर या आखाड्याचे नाव बदला, असे किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी म्हटले होते. त्यानंतर ममता कुलकर्णीचे महामंडलेश्वरचे पद काढून घेण्यात आले होते. आता ममता कुलकर्णीने एक व्हिडीओ शेअर करीत महामंडलेश्वर पदाचा त्याग करत असल्याचे म्हटले आहे.
सगळे अहंकारी लोक…
ममता कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ममता कुलकर्णीने म्हटले, “मी महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मी या पदाचा राजीनामा देत आहे. आज दोन्ही किन्नर आखाड्यांमध्ये मला महामंडलेश्वर म्हणून घोषित कऱण्यावरून वाद सुरू आहे. मी २५ वर्षांपासून साध्वी आहे आणि मी साध्वीच राहणार आहे. महामंडलेश्वर हा सन्मान मला दिला गेला होता, काही लोकांनी यावर आक्षेप घेतला.
“मी २५ वर्ष तप केले. बॉलीवूड मी २५ वर्षांपूर्वी सोडले आहे. मी स्वत:हून गायब राहिले. नाहीतर मेकअप, बॉलीवूडपासून इतके दूर कोण राहू शकेल? माझ्या अनेक गोष्टींवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. मी अमुक अमुक गोष्टी का करते, असा लोकांना प्रश्न पडलेला आहे. माझ्या महामंडलेश्वर होण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला, प्रश्नचिन्ह निर्माण केले, हे सगळे पाहिल्यानंतर मला असे वाटते की, माझे जे गुरू आहेत, ज्यांच्या सानिध्यात मी २५ वर्षे घोर तपस्या केली, त्यांचे नाव श्री चैतन्य गगन गिरी महाराज असे आहे. त्यांच्याबरोबरीचे मला कोणी वाटत नाही. सगळे अहंकारी लोक आहेत. एकमेकांबरोबर भांडत आहेत. माझ्या गुरूंचे स्थान मोठे आहे, त्यांच्या सानिध्यात मी तपस्या केली आहे, मला कोणत्या कैलास पर्वतात जाण्याची गरज नाही. मला कोणत्या मानसरोवर अथवा हिमालयात जाण्याची गरज नाही.”
“आज मी महामंडलेश्वर होण्यामुळे जे आक्षेप घेत आहेत, त्यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही. फक्त मला इतके सांगायचे आहे की, जे पैशाच्या देवाण-घेवाणविषयी बोलले जात आहे. जेव्हा मला दोन लाख मागितले गेले होते, त्याच खोलीत माझ्यासमोर ३-४ महामंडलेश्वर, ३-४ जगतगुरू होते. मी म्हटलं की माझ्याकडे दोन लाख नाहीत. तेव्हा तिथे बसलेल्या महामंडलेश्वर जय अंबा गिरी यांनी त्यांच्या खिशातून दोन लाख रूपये लक्ष्मी नारायण त्रिपाठींना दिले होते. पण याशिवाय जे म्हटले जात आहे की २, ३, ४ कोटी दिले आहेत. ज्ञान हे कोणत्याही पैशातून येत नाही. घोर तपस्या व ध्यानातून ते मिळवता येते. मी स्वत: काही केले नाही. ज्या चंडी देवीची मी २५ वर्षे आराधना केली, तिने मला संकेत दिले. आता तीच संकेत देत आहे की मी यातून बाहेर पडले पाहिजे. मी ही पदवी सोडत आहे.”
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद दिल्यानंतर एकाच आठवड्यात तिला या पदावरून हटवले होते. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली होती. याबरोबरच ममता कुलकर्णीची मंडलेश्वर पदावर निवड केल्याबद्दल लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनादेखील आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवून आखाड्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान, ममता कुलकर्णीने अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.