‘आशिक आवारा’, ‘वक्त हमारा है’, ‘अशांत’, ‘करण-अर्जुन’, ‘बाजी’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘जाने जिगर’, ‘छुपा रूस्तम’ अशा गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी(Mamta Kulkarni) होय. अभिनेत्री जितकी तिच्या अभिनयामुळे चर्चेत राहिली, तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत राहिली. विकी गोस्वामीबरोबर अभिनेत्रीचे नाव जोडले गेले. आता त्यांची ओळख कशी झाली, त्यांची भेट कधी झाली याविषयी अभिनेत्रीने एका मुलाखतीत स्वत:च खुलासा केला आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
ममता कुलकर्णीने नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ममता कुलकर्णीला विचारण्यात आले की, विकी गोस्वामी कोण आहे, ते तुमच्या आयुष्यात कसे आले आणि तुमच्या आयुष्यात त्यांचे काय स्थान आहे? यावर उत्तर देताना ममता कुलकर्णीने म्हटले, “ते मला शोधत आले, कारण तोपर्यंत इंडस्ट्रीमधील बरेच जण दुबईमध्ये गेले होते. त्याच्या हॉटेल्सच्या ओपनिंगला वैगेरे बॉलीवूडमधील अनेक जण गेले होते. एक नवीन सेक्रेटरी माझ्या आयुष्यात आला आणि त्याच्या संपर्कातून मला विकी गोस्वामीचा फोन आला. मी विचारले की कोणाचा फोन आहे. मला सांगितले गेले की विकी गोस्वामी बोलतोय. मी विचारले की कोण विकी गोस्वामी? तर त्याने मला सांगितले की, तो खूप मोठा आहे. त्याच्या सोन्याच्या खाणी आहेत. त्याचे प्रायव्हेट जेट आहे. तर तो एक महिना कोणाच्या कोणाच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असायची. तो खूप गोड बोलायचा. मला वाटले ही खूप चांगला आहे. चांगले बोलतो, प्रेमाने बोलतो.”
“१९९६ ला मी त्याला भेटण्यासाठी दुबईला गेले. मला तो आवडू लागला. मी परत आले. मग मला समजले की त्याचे लग्न झाले आहे. मी त्याला फोन केला आणि विचारले की, तू मला कधीच सांगितले नाहीस की तुझे लग्न झाले आहे. तर त्याने मला समजावण्याचा प्रयत्न केला. मी त्याला म्हटले मला लग्न झालेल्या व्यक्तीशी लग्न करायचे नाही. मला कोणाचे कुटुंब उद्ध्वस्त करायचे नाही. त्याने मला सांगितले की आम्ही एकाच घरात राहतो, पण आम्ही वेगळे झालो आहोत. मी म्हटले ठीक आहे.”
पुढे ममता कुलकर्णीने म्हटले की, १९९६-९७ मध्ये त्याला दुबई पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मी माझ्या शूटिंगमध्ये व्यग्र झाले. एकदा त्याने मला तुरूंगातून फोन केला होता. मी सुरुवातीला बोलू नकोस असे सांगितले. तर तो मला म्हणू लागला की, मी यातून बाहेर येऊ शकेन की नाही माहीत नाही. मला हे लोक कोणत्यातरी पेपरवर सह्या करायला सांगत आहेत. त्यावर सह्या करण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन. मग मी त्याला म्हटले की तू बाहेर येशील की नाही, हे मी माझ्या गुरूंना विचारून सांगते. मला दोन दिवसात फोन कर. माझ्या गुरूंनी मला सांगितले की तो बाहेर येईल, पण त्यासाठी वेळ आहे. मग त्याचा फोन आल्यानंतर मी त्याला हे सांगितले. त्यानंतर तो गायब झाला. त्यानंतर २००१ मध्ये माझी आई गेली. त्यानंतर माझे बॉलीवूडमधून मन उडाले. तोपर्यंत बॉलीवूडमध्येदेखील माझ्याबरोबर खूप गोष्टी झाल्या होत्या. मी एकटी पडले होते. त्याचदरम्यान, विकी गोस्वामीचा फोन आला. त्याने मला विचारले की तू मला एकदा भेटायला येशील का? मी त्याला भेटण्यासाठी गेले. मला सगळ्यांनी सांगितले होते की जाऊ नकोस. मी म्हटलं की माहीत नाही त्याचे काय होईल. चुकीचे बोलतोय की बरोबर बोलतोय माहीत नाही, पण तो मनाने चांगला आहे. तर मी त्याला भेटायला गेले.
ममता कुलकर्णीने म्हटले की, तो जेव्हा तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो दुबईहून केनियाला गेला. त्याला तिथेही पोलिसांनी पकडले. त्यानंतर त्याला अमेरिकेला घेऊन गेले. तेव्हाही मी त्याच्याबरोबर नव्हते.
हेही वाचा: मोठी बातमी! अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, अभिनेत्याची तेलंगणा हायकोर्टात धाव
याच मुलाखतीत विकी गोस्वामीबरोबर लग्न केले नव्हते, असे ममता कुलकर्णीने स्पष्ट केले आहे. याबरोबरच, तिने मोठ्या प्रमाणात ध्यान-धारणा, तप केल्याचे म्हटले आहे.