Mamta Kulkarni: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी महाकुंभमेळ्यात शुक्रवारी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली. तिने संन्यास घेतला आहे. ममता दोन दशकांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे, ती मुंबईत परत आल्यावर चित्रपटांमध्ये काम करेल, अशा चर्चा होत्या. आता तिने महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला, त्यामुळे ती पुन्हा चित्रपटांमध्ये काम करेल की नाही याबद्दल तिला विचारण्यात आलं. ममताने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल प्रतिक्रिया दिली.
५२ वर्षीय ममता म्हणाली की ती सुमारे २३ वर्षांपासून तपश्चर्या करत आहे आणि तिला जे नवीन पद देण्यात आलं ते तिच्यासाठी ‘ऑलिम्पिक पदका’सारखं आहे. या आध्यात्मिक प्रवासासाठी ती स्वतःला नशीबवान समजते आणि चित्रपटांमध्ये परत जाण्याची कल्पना करू शकत नाही, असं तिने नमूद केलं.
चित्रपटात काम करण्याबद्दल ममता म्हणाली…
“मी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्याची कल्पनाही करू शकत नाही. आता हे अशक्य आहे,” असं ती म्हणाली. “किन्नर आखाड्याचे लोक भगवान शिवच्या अर्धनरेश्वर अवताराचे आणि देवी पार्वतीचे प्रतिनिधित्व करतात. अशा आखाड्याचा महामंडलेश्वर बनणं हे २३ वर्षांच्या आध्यात्मिक अभ्यासानंतर मला मिळालेल्या ऑलिम्पिक पदकासारखं आहे,” अशा भावना ममता कुलकर्णीने व्यक्त केल्या.
ममताने किन्नर आखाडा का निवडला? म्हणाली…
आदिशक्तीच्या आशीर्वादानेच हा सन्मान मिळाला आहे, असं ममता म्हणते. तसेच “मी किन्नर आखाड्याचा भाग होणं निवडलं, कारण ते स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करते. इथे कोणतीही बंधने नाहीत,” असं ममताने नमूद केलं. ममताने मनोरंजन विश्वात घालवलेली अनेक वर्षे आणि हिंदी सिनेविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम करण्याबद्दलही भाष्य केलं. “तुम्हाला आयुष्यात मनोरंजबरोबरच प्रत्येक गोष्टीची गरज आहे. तुम्ही तुमच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत. पण, अध्यात्म ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही फक्त नशिबानेच मिळवू शकता,” असं ती म्हणाली.
ममता कुलकर्णी २५ वर्षांपासून दुबईत राहत होती, तरीही ती फक्त कुंभ मेळ्यासाठी भारतात यायची. १२ वर्षांआधी झालेल्या कुंभ मेळ्यासाठीही ती भारतात आली होती. आता या कुंभमेळ्यात तिने संन्यास घेतला असून ती महामंडलेश्वर झाली आहे.