शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची यादी मोठी आहे. त्याच्या सगळ्याच चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ असे तीन चित्रपट आहेत. शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकणार असे दिसते.
आणखी वाचा : लग्न न करताच बाळ होण्याबद्दल जया बच्चन यांनी केलेल्या विधानावर नात नव्याची प्रतिक्रिया; म्हणाली…
दिग्दर्शक अटली ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. पण आता या चित्रपटाविरुद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माते माणिकम नारायण यांनी ‘तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिल’कडे तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटाची मूळ कथा तामिळ चित्रपट ‘पेरारसू’ची असून ती अटलींनी चोरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विजयकांत यांचा ‘पेरारसू’ हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेचे हक्क माणिकम नारायण यांच्याकडे आहेत. आता ‘जवान’ या चित्रपटाची कथा ‘पेरारसू’ सारखीच आहे असं माणिकम नारायण यांनी म्हटलं आहे. ‘पेरारसू’ या चित्रपटात विजयकांतने पेरारसू आणि इलवारसू अशी दुहेरी भूमिका साकारली होती. ‘जवान’ या चित्रपटातही शाहरुखची दुहेरी भूमिका असणार आहे. परंतु शाहरुखची खरोखर या चित्रपटात दुहेरी भूमिका असणार की नाही याबद्दल अटलींनी अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. ‘तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिल’ या प्रकरणाचा ७ नोव्हेंबरनंतर तपास करतील असं समोर आलं आहे.
हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी
दरम्यान शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘जवान’ हा चित्रपट २०२३च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपतीदेखील दिसणार असल्याची चर्चा आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे असं बोललं जात आहे.