बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरा(Manisha Koirala)ला ही ९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आता मात्र अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मनीषाने बॉलिवूडचा किंग शाहरुख खान(Shah Rukh Khan) आणि तिच्या बॉलिवूडमधील करियरच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल भाष्य केले आहे. या दोन कलाकारांनी १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
काय म्हणाली अभिनेत्री?
मनीषा कोईरालाने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्रीने शाहरुख स्टार बनण्याच्या अगोदर जेव्हा तो त्याची पत्नी गौरी हिच्याबरोबर माऊंट मेरी येथील अपार्टमेंटमध्ये राहात होता, तेव्हाची आठवण सांगितली आहे.
मनीषाने शाहरुख बरोबरच्या मैत्रीबद्दल म्हटले , “अभिनय क्षेत्रात आम्ही दोघेही अगदीच नवीन होतो, त्यावेळी आमची भेट झाली होती. त्यावेळी मी बऱ्याचदा शाहरुख आणि गौरी यांच्याबरोबर वेळ घालवत असे. त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे आणि आम्ही सगळे त्यावर गप्पा मारत बसायचो.”
मनीषाने पुढे बोलताना म्हटले की, शाहरुख खान हा पहिला व्यक्ती होता ज्याने मला मुंबईत घर विकत घेण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली, “आम्ही सगळे मित्र होतो आणि आमचं वय खूप कमी होतं. मी त्याच्या एक किंवा दोन वर्ष आधी मुंबईत आले होते. आमची चांगली मैत्री झाली. त्यानेच मला मुंबईमध्ये घर घेण्याचा सल्ला दिला होता, असा सल्ला देणारा तोच पहिला व्यक्ती होता. तो म्हणाला की आपण दोघेही मुंबईच्या बाहेरून आलो आहोत आणि इथं राहण्यासाठी आपल्याला जागा हवी. त्यामुळं आपलेपणा येईल. तू इथे स्थायिक होशील.”
मनीषा कोईराला कामाबद्दल बोलायचे झाल्यास, मनीषा कोईरालाने २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या गाजलेल्या ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ मध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. तर शाहरुख खान सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटात शाहरुख खानबरोबर त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिषेक बच्चन यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.