ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरुनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नसीरुद्दीन यांच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. त्यांनी केलेल्या भूमिकांसाठी त्यांना आतापर्यंत अनेक मोठे मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. नुकतंच त्यांनी या पुरस्कारांबाबत केलेलं एक वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं. ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचा वापर त्यांच्या मुंबई जवळील फार्महाऊसच्या दरवाजांची हँडल्स म्हणून केला असल्याचं सांगितलं. या वक्तव्यातून त्यांनी ‘फिल्मफेअर’सारख्या पुरस्कार सोहळ्यावर टीका केल्याचा अंदाज लोकांनी वर्तवला.

आणखी वाचा : “कपड्यांवरून बोल्डनेस ठरवणं…” अभिनेत्री रसिका सुनीलने मांडलं रोखठोक मत

त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी त्यांना ट्रोल केलं. आता बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी नसीरुद्दीन यांचं वक्तव्य खोडून काढलं आहे. ‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधतांना या दोघांनी नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुभाष घई म्हणाले, “फिल्मफेअर हा एक प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांचा कधीच अनादर करू नये. मला स्वतःला त्याचं नामांकन बऱ्याचदा मिळालं आहे पण केवळ ३ वेळाच मला तो पुरस्कार मिळाला, त्या पुरस्कारासाठी मिळणारं नामांकनही त्या पुरस्कार इतकं महत्त्वाचं असतं.”

मनोज बाजपेयी यांनीही याबद्दल वक्तव्य दिलं. ते म्हणाले, “मी फिल्मफेअर सोहळे पाहातच लहानाचा मोठा झालो. इथे लोकांच्या कामाची दखल घेतली जाते, त्यांना ओळख मिळते. फिल्मफेअर ही माझ्या आयुष्यातील अत्यंत मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. माझ्या आयुष्याचा हा एक अमूल्य भाग आहे.” नसीरुद्दीन यांनी थेट फिल्मफेअरचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचं हे वक्तव्य बऱ्याच लोकांना खुपलं आहे. नसीरुद्दीन यांना आजवर ‘आक्रोश’, ‘चक्र’ आणि ‘मासूम’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpayee and subhash ghai reacts on naseeruddin shah filmfare statement avn