Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी आजवर कायम वेगळी आणि परिघाबाहेर विचार करणारी पात्रे साकारली आहेत. ‘गँग ऑफ वासेपूर’, ‘दाऊद’, ‘सत्या’, ‘तमन्ना’, ‘सरकार ३’ असे एकपेक्षा एक थ्रिलर आणि मनोरंजनासाठी पैसा वसूल ठरणारे चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. १९९८ साली मनोज वाजपेयी यांचा ‘सत्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. त्यामध्ये मनोज वाजपेयी यांनी भिकू म्हात्रे हे पात्र साकारले होते. या चित्रपटानंतर मनोज वाजपेयी घराघरांत पोहोचले.
या पार्श्वभूमीवर आता मनोज वाजपेयी पुन्हा एकदा प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर काम करणार आहेत. त्यांनी स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबतची घोषणा केली आहे. आयडिया एक्स्चेंज या सत्रामध्ये मनोज वाजपेयी गुरुवारी आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी प्रकल्पाबद्दलची माहिती दिली. त्यांनी सांगितले, “प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राम गोपाल वर्मा त्यांचा पुढचा चित्रपट माझ्याबरोबर बनवणार आहेत. फक्त त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे. त्यानंतर आम्ही या चित्रपटाच्या तारखांवर बोलणार आहोत. तारखा ठरल्यानंतर लगेचच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.”
राम गोपाल वर्मा यांच्या सत्या या चित्रपटाने मनोज वाजपेयी यांच्या चित्रपट प्रवासाला एक वेगळे वळण दिले. त्यानंतर या दोघांनी ‘शूल’, ‘रोड’ व ‘सरकार ३’ या चित्रपटांमध्येही एकत्र काम केले. हे सर्वच चित्रपट फार गाजले आणि प्रेक्षकांनी या चित्रपटांवर भरभरून प्रेम केले. अशात मनोज वाजपेयी यांनी आणखी एका चित्रपटाची घोषणा केल्याने चाहत्यांच्या मनात याविषयी जाणून घेण्याची उत्सुकत लागली आहे.
मुलाखतीमध्ये त्यांना भिकू म्हात्रे पात्राबद्दल आणखी विचारण्यात आले. “आता त्यांना हे पात्र करायचे असेल, तर त्यांनी यात आणखी काही वेगळेपण आणले असते का,” या प्रश्नाला उत्तर देताना मनोज वाजपेयी यांनी म्हटले, “जेव्हा मी हे पात्र साकारलं तेव्हा माझ्यात एक वेगळी ऊर्जा होती. आता ती ऊर्जा राहिलेली नाही. रस्त्यानं चालतानासुद्धा माझी हाडे वाजतात आणि एखादी उडी मारावी लागली, तर मी स्वत:ची फार काळजी घेतो. प्रत्येक वयाचं त्या त्या वेळचं एक वेगळं सौंदर्य असतं.”
हेही वाचा : सलमान खान झिशान सिद्दिकींबरोबर दुबईला रवाना; फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, मनोज वाजपेयी लवकरच त्यांच्या ‘डिस्पॅच’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये मनोज एका पत्रकाराच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd