बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयींनी २००६ मध्ये आंतरधर्मीय लग्न केलं. त्यांची पत्नी शबाना रझा ही मुस्लीम आहे. आंतरधर्मीय लग्न करताना मनोज यांच्या कुटुंबाने विरोध केला नव्हता, असं त्यांनी सांगितलं. त्यांचे वडील मोकळ्या विचारांचे होते, त्यांनी नात्याला विरोध केला नव्हता. मी आणि शबाना दोघेही आपापल्या धार्मिक श्रद्धांचे पालन करतो, असं त्यांनी नमूद केलं.
बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत, मनोज यांना त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर आंतरधर्मीय लग्न करणं फार कठीण गेलं नव्हतं, असं त्यांनी सांगितलं. “आंतरधर्मीय लग्न करणं माझ्यासाठी फार कठीण राहिलं नाही. मला खरंच आश्चर्य वाटलं होतं. पण घरात विरोध झाला नव्हता,” असं मनोज यांनी सांगितलं. एका मुस्लीम मुलीशी लग्न करायचंय असं सांगितल्यावर कुटुंबीयांनी काहीच म्हटलं नाही, असं मनोज म्हणाले.
वडिलांच्या अंत्यसंस्कारात हिंदूपेक्षा मुस्लीम अधिक – मनोज बाजपेयी
मनोज म्हणाले, “माझे वडील खूप मोकळ्या विचारांचे होते. अतिशय नम्र होते. त्यांचे अनेक मुस्लीम मित्र होते. आता सत्तेत असलेल्या सरकारचे ते समर्थक होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या मुस्लीम लोकांची संख्या हिंदू लोकांपेक्षा जास्त होती.”
मुलीला धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य
मनोज व शबाना यांच्या मुलीचं नाव अवा आहे. “आमच्या घरात सर्वजण आपापल्या श्रद्धांचे पालन करतात. आमच्या लेकीलाही आता ते समजलं आहे. अवाच्या मित्र-मैत्रिणींच्या घरात धर्माबद्दल चर्चा होत असते. त्यामुळे ती बऱ्याचदा तिच्या आईला विचारते, ‘माझा धर्म काय आहे?’ आणि ती तिला म्हणते की “तू तुझा धर्म निवड”, असं मनोज म्हणाले.
हेही वाचा – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
मनोज बाजपेयींनी सांगितलं की ते दररोज मंदिरात पूजा करतात. तर त्यांची पत्नी तिच्या धार्मिक श्रद्धांचे पालन करते. “अवा कधी नमस्कार करते, कधी करत नाही. आम्ही या गोष्टींचा फार विचारही करत नाही,” असं मनोज म्हणाले.
धर्मावरून कधीच भांडणं होत नाही – मनोज बाजपेयी
“मी ब्राह्मण कुटुंबातून आलो आहे. तिचं कुटुंबही प्रतिष्ठित आहे, त्यांचंही समाजात नाव आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आमच्या लग्नाबद्दल कधीही आक्षेप घेतला नाही. आतापर्यंत कधीही नाही. तिला ती मुस्लीम असल्याचा अभिमान आहे आणि मला मी हिंदू असल्याचा अभिमान आहे. यावरून आम्ही कधीच एकमेकांशी भांडत नाही,” असं मनोज बाजपेयी एका मुलाखतीत म्हणाले होते.